
मुंबई: कलाकार हा असा माणूस असतो जो काहीही करू शकतो. कलाकार आपल्या कलाकारीने दगडात सुद्धा देव शोधू शकतो. आपण अनेकदा असे व्हिडीओ पाहिलेत ज्यात कलाकाराने आपल्या डान्स मधून देव दाखवला, आपल्या मुद्रांमधून देव दाखवला. शेफ सुद्धा एक कलाकार असतो. या व्हिडीओ मध्ये एका शेफने कलिंगडावर हनुमानाचं चित्र कोरलंय. आपण टॅटू मध्ये अनेकदा असे चित्र बघतो पण कलिंगडावर कोरलेला हनुमान तुम्ही पहिल्यांदाच बघाल. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.
केवळ धारदार चाकूचा वापर करून कलिंगडावर कोणाचेही चित्र रेखाटण्याची प्रतिभा शेफ अंकित बागियाल यांच्याकडे आहे. शेफची ही अद्भुत कला इन्स्टाग्राम वापरकर्त्यांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यांचे फॅन्स त्यांची कलाकृती दर्शविणारा कोणताही व्हिडिओ चुकवत नाहीत. अंकित नेहमीच एखादा प्रसंग किंवा मुद्दा निवडतो आणि त्याविषयी कलाकृती तयार करतो. उदाहरणार्थ, त्यांनी पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांना सुद्धा अशाच पद्धतीने आदरांजली वाहिली होती. अलीकडेच बहुप्रतीक्षित आदिपुरुष हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. त्या विषयाला घेऊनच अंकितने कलिंगडावर हनुमानाची मनमोहक प्रतिमा कोरलीये.
इंस्टाग्राम युजर्सने शेफचे अविश्वसनीय कलाकृतीबद्दल भरभरून कौतुक केले. व्हिडीओच्या खाली कमेंट बॉक्स “जय हनुमान” या कमेंटने भरलाय. कलिंगडावर हनुमानाची प्रतिमा कोरण्यापूर्वी अंकित बागियाल यांनी या फळावर दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा फोटो कोरला होता, ज्याचे खूप कौतुक झाले होते.