लवकर बाळाचं प्लॅनिंग तर नाही ना…जॉब इंटरव्ह्युवमध्ये HR चा महिलेला धक्कादायक प्रश्न; सोशल मीडियावर चर्चा

सोशल मीडियावर एका महिलेने जॉब इंटरव्ह्युव दरम्यान आलेला अनुभव शेअर केला आहे. मुलाखती दरम्यान एचआरने तिला असा प्रश्न विचारला, ज्यामुळे ती अस्वस्थ झाली. या महिलेने सोबत नेमकं असं काय घडलं होतं, जाणून घेऊया.

लवकर बाळाचं प्लॅनिंग तर नाही ना...जॉब इंटरव्ह्युवमध्ये HR चा महिलेला धक्कादायक प्रश्न; सोशल मीडियावर चर्चा
| Edited By: | Updated on: Oct 20, 2026 | 10:30 AM

जॉब इंटरव्ह्युव म्हटलं की त्यात उमेदवाराचे शिक्षण, अनुभव आणि काम करण्याची क्षमता याबद्दल प्रश्न विचारले जातात. मात्र, एका महिलेला मुलाखती दरम्यान लग्न आणि बाळाच्या प्लॅनिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आल्याने त्या अस्वस्थ झाल्या. या महिलेने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून मुलाखतीचा अनुभव सांगितला. विवाहित महिलेला लवकरच बाळाचे नियोजन करण्याचा विचार आहे का, असा प्रश्न विचारणे योग्य आहे का, यावरून आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

मुलाखती दरम्यान निघाला लग्नाचा विषय

Loading...

इन्स्टाग्रामवर शताक्षी द्विवेदी यांनी मुलाखतीदरम्यान आलेला अनुभव सांगणारा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुलाखतीची सुरुवात सामान्य पद्धतीने झाली होती. एचआरने त्यांना त्या कुठे राहतात आणि घरापासून ऑफिसला येण्या-जाण्यात काही अडचण येईल का, असे विचारले. यावर शताक्षी यांनी कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले. त्यांचे पतीही त्याच परिसरात ऑफिसला जात असल्याने त्या त्यांच्या सोबत येऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर मात्र एचआरच्या बोलण्याची पद्धत पूर्णपणे बदलली.
शताक्षी यांनी नुकतेच लग्न झाल्याचे सांगितल्यानंतर एचआरने त्यांना लवकरच बाळाचे नियोजन करण्याचा विचार आहे का, असा प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकून त्यांना अस्वस्थ वाटले.

महिलेने व्यक्त केली नाराजी

शताक्षी यांनी सोशल मीडियावर आपला अनुभव सांगताना महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल बोलणाऱ्या कंपन्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. एकीकडे कंपन्या महिलांना समान संधी देण्याबद्दल बोलतात, तर दुसरीकडे मुलाखतीदरम्यान त्यांच्या लग्नाबद्दल आणि बाळाच्या नियोजनाबद्दल प्रश्न विचारले जातात, असे त्यांनी म्हटले. शताक्षी यांनी मुलाखत दिलेल्या कंपनीचे नाव मात्र जाहीर केलेले नाही.

सोशल मीडियावर उमटल्या प्रतिक्रिया

शताक्षी यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक महिलांनीही मुलाखतीदरम्यान आलेले असेच अनुभव शेअर केले. काही यूजर्सच्या मते, अविवाहित महिलांना लग्न कधी करणार, असे विचारले जाते, तर विवाहित महिलांना बाळाच्या नियोजनाबद्दल प्रश्न विचारले जातात. ज्या महिलांना मुले आहेत, त्यांना नोकरी आणि मुलांची जबाबदारी एकाच वेळी कशी सांभाळणार, असेही विचारले जाते.

काही यूजर्सनी २०२६ मध्येही महिलांना अशा प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. तर काहींनी मुलाखतीमध्ये उमेदवाराच्या वैयक्तिक आयुष्याऐवजी त्याचे शिक्षण, कौशल्ये आणि काम करण्याची क्षमता यांना महत्त्व दिले पाहिजे, असे मत मांडले.

मुलाखतीतील वैयक्तिक प्रश्नांवर चर्चा

या घटनेमुळे नोकरीच्या मुलाखतीदरम्यान महिलांना विचारल्या जाणाऱ्या वैयक्तिक प्रश्नांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मुलाखतीचा मुख्य उद्देश उमेदवाराची पात्रता आणि काम करण्याची क्षमता तपासणे हा असतो. त्यामुळे लग्न किंवा बाळाच्या नियोजनाबद्दल प्रश्न विचारणे कितपत योग्य आहे, यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us