11 कोटींची लॉटरी जिंकल्यानंतर 3 महिने जे केलं, त्यानंतर थेट ICU मध्ये, नेमकं काय घडलं?

लॉटरी लागून रातोरात आपलं आयुष्य बदलावं, अचानक श्रीमंत व्हावं आणि सर्वकाही मिळावं.. असं कोणाचं स्वप्न नसतं? परंतु या जगात असेही काही लोक आहेत, ज्यांचं हे स्वप्न सत्यात उतरतं. परंतु त्यानंतर मिळालेल्या पैशांचं नेमकं काय करावं, हे त्यांना सुचत नाही.

11 कोटींची लॉटरी जिंकल्यानंतर 3 महिने जे केलं, त्यानंतर थेट ICU मध्ये, नेमकं काय घडलं?
party
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 08, 2025 | 12:02 PM

अचानक आपल्याला लॉटरी लागावी आणि रातोरात आपलं आयुष्य बदलावं.. असं अनेकांचं स्वप्न असतं. आयुष्यात कधीतरी एकदा लॉटरी लागेल या आशेनं अनेकजण तिकिटं विकत घेतात. परंतु त्यातून फार क्वचित लोकांचं नशीब फळफळतं. असंच काहीसं युनायडेट किंग्डममधील नॉरफोक इथं राहणाऱ्या 39 वर्षी ॲडम लोपेझसोबतत घडलंय. एका लॉटरीच्या तिकिटामुळे तो चर्चेत आला आहे. ॲडम एक सर्वसामान्य ड्राइव्हर असून त्याने स्क्रॅच-ऑफ लॉटरीचं तिकिट जिंकलं. या लॉटरीचं बक्षिस होतं तब्बल 1.3 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 11 कोटी रुपये. ॲडमच्या बँक खात्यात फक्त 17 डॉलर्स होते. परंतु एका लॉटरीमुळे त्याचं आयुष्य पालटलं आणि तो क्षणार्धात करोडपती झाला.

इतके पैसे अचानक मिळाल्यानंतर ॲडमला काय करावं हेच सुचत नव्हतं. परंतु आता आयुष्यात मुक्तपणे जगायचं, कशाचीच पर्वा करायची नाही, असं त्याने ठरवलं होतं. लॉटरीमुळे एका रात्रीत श्रीमंत झाल्यानंतर ॲडमने ड्राइव्हरची नोकरी सोडली आणि त्यानंतर तो सलग तीन महिने पार्टी करत होा. “मी न थांबता पार्टी करत होतो. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच इतका मुक्त जगत होतो. परंतु पैशांच्या आहारी जाऊन मी चुकीच्या मार्गावर गेलो. इतके सारे पैसे पाहून मी वेडापिसा झालो होतो. ते सर्व पैसे मी दिवसरात्र केवळ पार्टी करण्यात घालवत होतो”, असं त्याने सांगितलं.

जुलैमध्ये लॉटरी लागल्यानंतर ॲडमने तीन महिने सलग पार्ट्या केल्या. त्यानंतर सप्टेंबरमध्ये त्याची तब्येत अचानक बिघडली. त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवत होता आणि चालणंही कठीण झालं होतं. अखेर रुग्णवाहिका बोलावून ॲडमला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जेव्हा स्ट्रेचरवर उचलून ॲडमला रुग्णवाहिकेत ठेवण्यात आलं, तेव्हा तो माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा धक्का असल्याचं त्याने सांगितलं. रुग्णालयात काही तपासण्या केल्यानंतर ॲडमच्या फुफ्फुसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या असल्याचं निदान झालं होतं.

ॲडमवर नॉरफोक आणि नॉर्विच युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. तिथे तो आठ दिवसांपेक्षा अधिक काळ होता. “तिथले लोक देवदूतासारखे होते. त्यांनी मला पुन्हा जीवदान दिलं. माझ्यासाठी हा सर्वांत मोठा धडा होता. तुमच्याकडे दहा लाख असोत किंवा अब्जावधी रुपये.. जेव्हा तुम्ही रुग्णवाहिकेत निपचित पडून असता तेव्हा कोणतेच पैसे महत्त्वाचे नसतात.”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला. ॲडम सध्या त्याच्या आरोग्यावर आणि पूर्णपणे बरं होण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. पुढील सहा ते नऊ महिन्यांत पूर्णपणे बरं होण्याचं त्याचं ध्येय आहे. यावेळी त्याने नोकरी सोडल्याचाही पश्चात्ताप व्यक्त केला.