
पावसाळा हा ऋतू हिरवळ आणि थंड वातावरणाने मनाला शांत करतो, तसेच पावसाचे थेंब जेव्हा जमिनीवर पडतात तेव्हा हवामान आल्हाददायक होते. पण त्याचवेळी वातावरणातील आर्द्रता निर्माण झाले की डास, कीटक, माश्या यांचा त्रास सुरू होतो. या किटकांमुळे आपण आजारी पडण्याचीही शक्यता असते. तसेच पावसाळ्यात पाण्यात प्रजनन करणाऱ्या डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची दहशत दरवर्षी दिसून येते. यामुळे आपल्याला आजार बळावतात, म्हणून आधीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. काही खबरदारी घेण्यासोबतच, असे उपाय देखील आहेत जे कीटकांना दूर करण्यासाठी प्रभावी आहेत.
पावसाळ्यात, स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, विशेषतः जिथे उघड्यावर वस्तू ठेवल्या जातात तिथे ओलावा किंवा घाण येऊ देऊ नये. तसेच घरातील व घराबाहेरील कोपऱ्यांवरील ओलावा दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यासोबतच, भांडी, पेट्या, रिकामे टायर इत्यादींमध्ये पाणी भरू देऊ नये. तसेच तुमच्या आरोग्याला कोणतेही नुकसान न होता किटक व डास हे घरात येऊ नये यासाठी कोणते सोपे नैसर्गिक उपाय करता येतील ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात…
आपल्या प्रत्येकांच्या स्वयंपाकघरात तमालपत्र सहज मिळते आणि देवघरात असलेला कापूर. तर या दोन्ही गोष्टी कीटक आणि डासांना दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. यासाठी तमालपत्राचे लहान तुकडे करा आणि ते एका लहान मातीच्या किंवा धातूच्या भांड्यात ठेवा आणि नंतर त्यात थोडे कापूर टाका. आता कापूर पेटवल्यानंतर विझवा. आता यातून निघणारा धूर तुम्ही संपूर्ण घरातील कोपऱ्यावर तसेच घरात दाखवा. त्यामुळे कोपऱ्यात लपलेले डास आणि कीटक पळून जातील.
मिरची आणि बेकिंग सोडा हे देखील आपल्या घरात असतात. जर तुम्हाला पावसाळ्यात कीटक आणि मुंग्यांचा त्रास होत असेल, तर या दोन्ही गोष्टी एकत्र करा आणि त्यात काही थेंब पाणी टाका. आता याचे लहान गोळे बनवा आणि ते कोपऱ्यात तसेच खिडक्यांच्या गॅप असलेल्या ठिकाणी ठेवा. यामुळे झुरळे, ओलाव्यामुळे येणारे कीटक आणि मुंग्या दूर होतील.
जर स्वयंपाकघर किंवा बाथरूमच्या कोपऱ्यात पावसाळी कीटक असतील तर बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिक्स करा. त्यात थोडे पाणी टाकून कोपऱ्यात शिंपडा, तुम्ही ते खिडक्यांच्या कडा, दरवाजांच्या कडा इत्यादींवर देखील स्प्रे करू शकता. यामुळे किटक घरात येत नाहीत.
घरात कोरड्या कडुलिंबाची पाने जाळल्याने त्याच्या धुरामुळे कीटक आणि डास दूर राहतात. याशिवाय सुक्या कडुलिंबाची पाने कपाटात ठेवता येतात. कीटकांना दूर ठेवण्यासाठी कडुलिंबाचे तेल देखील वापरले जाऊ शकते. कडुलिंबाच्या तेलात कापसाचा गोळा भिजवा आणि कोपऱ्यात ठेवा. यामुळे किटक, डास, मुंग्या व माश्या घरात येत नाही.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)