
मुंबई: पिझ्झा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. आपण भारतीयांसाठी खरं तर पिझ्झा हा बाहेरचा पदार्थ आहे, हा भारताचा पदार्थ नाही. पिझ्झा बनवायचे अनेक प्रकार आपण पाहतो. आता सोशल मीडियावर तर पिझ्झाची नुसती चव काय तो कसा बनवला जातो याचे देखील व्हिडीओ व्हायरल होतात. जसजसा पिझ्झा लोकप्रिय होऊ लागला तसतसा तो वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जाऊ लागला. त्यासाठीही लोकांनी डोकं लावायला सुरुवात केली. आता तर दर किलोमीटरवर पिझ्झा बनविण्याची पद्धत वेगळी आहे. सगळं पाहिलंय तुम्ही, पण कधी ज्वालामुखीवर बनवला जाणारा पिझ्झा पाहिलाय का? तुम्ही खाणार का असा पिझ्झा? त्याहीपेक्षा ज्वालामुखीवर बनवला जाणारा पिझ्झा म्हणजे किती मोठी ती रिस्क!
एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये एक महिला ज्वालामुखीवर पिझ्झा बनवत आहे. इथे एक प्रवासी महिला खास ज्वालामुखीवर बनवलेला पिझ्झा खायला आलीये. हाच व्हिडीओ व्हायरल झालाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना मेक्सिकोच्या दक्षिणेला असलेल्या ग्वाटेमालामधील आहे. हे ठिकाण जगभर प्रसिद्ध कारण इथे धगधगत्या ज्वालामुखीवर ठेवून पिझ्झा बनवला जातो. एलेक्जेंड्रा ब्लोडेट नावाची फूड ब्लॉगर इथे गेली आणि तिने हा पिझ्झा ट्राय केला, हा व्हिडीओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलाय.
तिने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, ती सक्रिय ज्वालामुखीवर बनवलेला पिझ्झा खाण्यासाठी ग्वाटेमालाला गेली होती. अलेक्झांड्रा पुढे म्हणाली की, सध्या तिथे जोरदार वारे आणि थंडी आहे. त्यामुळे उबदार कपडे घेऊन जा. आधी एक व्यक्ती कच्चा पिझ्झा जमिनीत टाकून झाकताना दिसते, मग तो पिझ्झा बाहेर काढून सर्व्ह केला जातो.
ग्वाटेमाला हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2021 मध्ये इथे सर्वात मोठा स्फोट झाला. ज्याचा लावा अनेक किलोमीटर दूर पसरला होता. त्यावेळी बराच वेळ तिथे कोणीही पोहोचू शकले नव्हते. धगधगत्या ज्वालामुखीवर पिझ्झा बनविण्याची ही पहिली वेळ नाही याआधी देखील असे पिझ्झे बनवण्यात आलेत.