आग लावा तुमच्या नोकरीला, 18 लाखांची नोकरी सोडून सुरु केला व्यवसाय, आजची कमाई पाहून डोळे फिरतील
18 लाखांचं वार्षिक पॅकेज असणारी IT नोकरी सोडली अन् 42 वर्षीय व्यक्तीने सुरु केला नवीन व्यवसाय. आता महिन्याला कमावतो 3.5 लाख रुपये. सर्वजण करत आहेत कौतुक.

IT क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी, कॉर्पोरेट जीवनातील सुविधा आणि सुरक्षित उत्पन्न असतानाही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस फारच कमी जण करतात. मात्र, हैदराबादमधील एका 42 वर्षीय टेक एक्सपर्टने नोकरीच्या सुरक्षित चौकटीबाहेर पडत स्वतःचा डेअरी व्यवसाय सुरू केला. विशेष म्हणजे, आज त्यांच्या या व्यवसायाची महिन्याला उलाढाल सुमारे 3.5 लाखांपर्यंत पोहोचली असून, त्यातून जवळपास 1.5 लाखांचा नफा मिळत आहे.
या व्यक्तीची प्रेरणादायी कहाणी सॉफ्टवेअर इंजिनिअर विकास ऑलवेज यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केली. त्यांच्या पोस्टनुसार, संबंधित 42 वर्षीय व्यक्तीने उस्मानिया विद्यापीठातून बीटेकचे शिक्षण घेतले असून, ते IT क्षेत्रात कार्यरत होते. त्यांना वर्षाला सुमारे 18 लाखांचे पॅकेज मिळत होते.
IT क्षेत्रातील अस्थिरतेने वाढली चिंता
कॉर्पोरेट क्षेत्रात चांगली नोकरी आणि आकर्षक पगार असूनही गेल्या काही काळात IT क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीमुळे त्यांना नोकरीच्या भवितव्याची चिंता वाटू लागली. अमेरिकेतील राजकीय बदल आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुनरागमनानंतर IT बाजारावर होणाऱ्या संभाव्य परिणामांमुळे अनेक कंपन्यांमध्ये प्रोजेक्ट्स आणि कामाच्या संधींबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती.
त्यांच्या कंपनीतही प्रोजेक्ट्स कमी होऊ लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिणामी, भविष्यात नोकरी गमावण्याची शक्यता आणि त्यातून निर्माण होणारी आर्थिक असुरक्षितता याचा ते सतत विचार करू लागले. मात्र, नोकरी जाण्याची वाट पाहत सतत तणावात राहण्याऐवजी त्यांनी स्वतःच वेगळा मार्ग निवडला.
नोकरीचा राजीनामा देऊन सुरू केला डेअरी व्यवसाय
या 42 वर्षीय टेक एक्सपर्टने अखेर IT क्षेत्रातील नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नोकरीतून मिळवलेली बचत वापरून ऑर्गेनिक डेअरी व्यवसाय सुरू केला.
या निर्णयामागे एक महत्त्वाची गोष्ट होती. त्यांच्यावर कोणतेही कर्ज नव्हते. त्यामुळे व्यवसाय सुरू करताना कर्जाच्या हप्त्यांचा किंवा मोठ्या आर्थिक दायित्वांचा दबाव त्यांच्या डोक्यावर नव्हता. स्वतःची बचत असल्याने व्यवसायात आवश्यक तेवढा धोका घेणे त्यांना शक्य झाले.
त्यांनी सुरुवातीला शुद्ध दूध, दही, पनीर आणि देसी तूप यांसारख्या ऑर्गेनिक डेअरी उत्पादनांची विक्री सुरू केली. हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद वाढत गेला आणि व्यवसायाने चांगली गती पकडली.