
Jalgaon : आधुनिक युगात नाती केवळ माणसांपुरती मर्यादित राहिली नसून माणूस आणि प्राणी यांच्यातील भावनिक बंधही तितकेच घट्ट असतात याचं हृदयस्पर्शी उदाहरण जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा गावात पाहायला मिळत आहे.

येथील शेतकरी नामदेव महाजन यांचा दीड वर्षांचा लाडका श्वान ‘लाल्या’ अचानक शेतातून बेपत्ता झाला असून या घटनेमुळे संपूर्ण महाजन कुटुंब शोकाकुल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाल्या नेहमीप्रमाणे शेतात त्यांच्या सोबत होता. मात्र अचानक तो कुठेही न दिसल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला.

अनेक ठिकाणी शोध घेऊनही लाल्या सापडला नाही. कोणी तरी त्याला चोरून नेले असावे अशी भीती महाजन यांनी व्यक्त केली आहे. लाल्या हा केवळ पाळीव श्वान नव्हता तर तो महाजन कुटुंबाचा अविभाज्य भाग होता. घरातील प्रत्येकाच्या जीवनात त्याचं वेगळंच स्थान होतं.

आपल्या भावना व्यक्त करताना नामदेव महाजन म्हणाले, लाल्या माझ्या नातवासारखाच होता. माझ्याशिवाय तो एक मिनिटही राहत नव्हता. आमच्यात एक खास नातं जुळलं होतं. लाल्याच्या अचानक बेपत्ता होण्याने कुटुंबीय अक्षरशः व्यथित झाले असून घरात चिंतेचं वातावरण आहे.

लाडक्या श्वानावर असलेल्या अपार प्रेमापोटी नामदेव महाजन यांनी लाल्याचा शोध घेऊन सुरक्षित परत आणणाऱ्यास तब्बल 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हे बक्षीस केवळ आर्थिक नाही तर माणूस–प्राणी नात्यातील प्रेम, आपुलकी आणि संवेदनशीलतेचं प्रतीक ठरत आहे.

लाल्याचा शोध लागावा यासाठी नामदेव महाजन यांनी भावनिक आवाहन करणारा संदेश परिसरातील सर्व व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर शेअर केला आहे.

यानंतर गावासह पंचक्रोशीत नागरिक स्वतःहून लाल्याचा शोध घेत आहेत. अनेकांनी शेतशिवार, रस्ते, बाजारपेठा आणि आजूबाजूच्या गावांत चौकशी सुरू केली आहे.