
सर्वजण लहानपणापासून एकच गोष्ट ऐकत आलो आहोत, दिवसानंतर रात्र येते आणि सूर्य मावळला की अंधार पसरतो. मात्र, जगात एक असा देश आहे जिथे तब्बल दोन महिने सूर्य मावळतच नाही.

ना पूर्ण रात्र होते, ना घनदाट अंधार. मध्यरात्रीही आकाशात सूर्य दिसत राहतो आणि आजूबाजूला मंद उजेड पसरलेला असतो. सोशल मीडियावर सध्या या अनोख्या देशाची मोठी चर्चा सुरू असून लोक याला निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणत आहेत.

हा अनोखा देश म्हणजे नॉर्वे. नॉर्वेला जगभरात ‘मिडनाइट सन’ म्हणजेच अर्ध्या रात्रीचा सूर्य यासाठी ओळखले जाते. दरवर्षी काही महिन्यांसाठी नॉर्वेमध्ये जणू वेळच थांबल्यासारखा भास होतो. येथे संध्याकाळ होते पण पूर्ण अंधार कधीच होत नाही.

नॉर्वे आर्क्टिक सर्कलच्या अत्यंत जवळ असणारा देश आहे. त्याची भौगोलिक रचना आणि पृथ्वीवरील स्थान यामुळेच तिथे ही अद्भुत नैसर्गिक घटना घडते. दरवर्षी मे ते जुलै या कालावधीत सुमारे 76 दिवसांपर्यंत नॉर्वेमध्ये सूर्य अस्ताला जात नाही.

सूर्य क्षितिजाजवळ फिरत राहतो, मात्र पूर्णपणे खाली मावळत नाही. त्यामुळे मध्यरात्रीही आकाशात उजेड कायम राहतो. या काळात पृथ्वीचे घूर्णन अंधाराला नॉर्वेजवळील काही भागांपर्यंत घेऊन येते, मात्र नॉर्वे देशाला संपूर्णपणे अंधारात लपेटू शकत नाही. अंधार जणू या देशाला स्पर्श करून पुढे निघून जातो.

दरम्यान, येथे फक्त हलकीशी संध्याकाळ अनुभवायला मिळते पण पूर्ण रात्र कधीच होत नाही. सोशल मीडियावर नॉर्वेच्या मिडनाइट सनचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. हे दृश्य पाहून लोक अचंबित होतात.