
एखाद्या लहान गावाची लोकसंख्या किती असू शकते? 100, 50 किंवा कमीत कमी 25 लोकं तरी… पण तुम्ही असं कोणत एखादा गावं ऐकलं किंवा पाहिलं आहे का, जिथे फक्त 1 हो, एकच व्यक्ती राहते ? हे ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर तुम्हाला कदाचित पचणार नाही, पण राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात एक गाव आहे जिथली लोकसंख्या फक्त 1 आहे. हो, हे अगदी खरं आहे. सरकार दरबारी नोंद असलेल्या या गावाचे नाव श्याम पंडिया आहे. हे गाव नेठवा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येते.
संपूर्ण गावात नाही घर, फक्त 1 मंदिर
आश्चर्याची बाब म्हणजे 2011 साली या रहस्यमय गावात जनगणना देखील करण्यात आली. जनगणनेनुसार, या गावाची लोकसंख्या फक्त एक (व्यक्ती) दाखवण्यात आली आहे. या व्यक्तीचे नाव ज्ञानदास आहे. विशेष म्हणजे या गावात एकही घर नाही. तर श्याम पांडिया धाम नावाचे एकच मंदिर आहे. या गावाचे नाव सरकारी नोंदींमध्ये या मंदिराच्या नावाने नोंदवले गेले आहे. हे मंदिर 521 बिघा सरकारी जमिनीच्या मध्यभागी 300 फूट उंच टेकडीवर बांधले गेले आहे.
मंदिराचे पुजारी ज्ञानदास हे नियमितपणे सकाळ-संध्याकाळ मंदिरात येऊन पूजा करतात.
अनेक वर्षांपासून गावात एकच व्यक्ती
असं म्हटले जाते की हे मंदिर शेकडो वर्षे जुने आहे. लोकांची मंदिरावर श्रद्धा आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या अमावस्येला येथे एक मोठा मेळा भरतो ज्यामध्ये शेकडो भाविक सहभागी होतात आणि मंदिरात प्रार्थना करतात. पुजारी ज्ञानदास यांच्या आधी राकेश गिरी नावाचा एक व्यक्ती या मंदिरात पूजा करत असे. राकेश गिरी यांच्या मृत्युनंतर ज्ञानदास यांनी पूजाची जबाबदारी घेतली. पूर्वी राकेश गिरी हे या गावाचे एकमेव रहिवासी होते आणि आता ज्ञान दास हे देखील या गावाचे एकमेव रहिवासी आहेत.
पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरतंय हे गाव
विशेष म्हणजे हे विचित्र गाव पाहण्यासाठी दरवर्षी शेकडो पर्यटक येतात. या गावाबद्दल ज्याला ऐकायला मिळतं, ती व्यक्ती हे गाव पाहण्यासाठी नक्कीच येतो. लोकांना हे आश्चर्यकारक वाटते की आपल्या देशात, एका राज्यात असंही एक गाव आहे ज्याची लोकसंख्या फक्त 1 आहे.. एकूण 521 बिघा जमीन असलेल्या या गावात मंदिराशिवाय इतर कोणतेही निवासी ठिकाण नाही. फक्त दीड बिघा जमीन घरांसाठी राखीव आहे. उर्वरित जमीन जनावरे चरण्यासाठी वापरली जाते.