40 हजारांची उशी! नेमकं असं काय आहे खास? जपानमध्ये भारतीय महिलेच्या खरेदीची सोशल मीडियावर चर्चा

जपानमध्ये एका भारतीय महिलेने चक्क 40 हजार रुपये खर्च करून खास कस्टमाइज्ड उशी खरेदी केली आहे. या उशीमध्ये असं नेमकं काय खास आहे की, तिच्यासाठी एवढी मोठी रक्कम मोजावी लागली? महिलेच्या या अनोख्या खरेदीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

40 हजारांची उशी! नेमकं असं काय आहे खास? जपानमध्ये भारतीय महिलेच्या खरेदीची सोशल मीडियावर चर्चा
Viral
| Edited By: | Updated on: Nov 07, 2026 | 12:51 PM

चांगली झोप मिळावी यासाठी अनेक जण आरामदायी गादी आणि उशी खरेदी करण्याला प्राधान्य देतात. मात्र, एका भारतीय महिलेने चांगल्या झोपेसाठी चक्क ४० हजार रुपये खर्च करून खास उशी खरेदी केली आहे. जपान दौऱ्यावर असताना त्यांनी ही कस्टमाइज्ड उशी खरेदी केली. विशेष म्हणजे, ही उशी सर्वसाधारण उशीप्रमाणे नसून ग्राहकाच्या शरीराची ठेवण, मानेची रचना आणि झोपण्याची पद्धत लक्षात घेऊन तयार केली जाते. महिलेने तिच्या या खरेदीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून एवढ्या महागड्या उशीमध्ये नेमके काय खास आहे, याबद्दल नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

४० हजारांची उशी खरेदी करणारी महिला कोण?

विपंदीप कौर असे या महिलेचे नाव असून, त्या व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट (CA) आहेत. जपान दौऱ्या दरम्यान त्यांनी निहोनबाशी परिसरातील निशिकावा (Nishikawa) या प्रसिद्ध बेडिंग ब्रँडच्या दुकानातून ही उशी खरेदी केली. विशेष म्हणजे, या दुकानाला जवळपास ४०० वर्षांचा इतिहास आहे. ४ नोव्हेंबर रोजी त्यांनी इन्स्टाग्रामवर या खरेदीचा व्हिडीओ शेअर केला. दिवसभर लॅपटॉपवर काम करणे आणि मोबाईलचा अधिक वापर यामुळे त्यांना मानेचा त्रास जाणवतो. तसेच झोपेशी संबंधित समस्यांचाही सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading...

कशी तयार होते ४० हजारांची?

या खास उशीची निर्मिती करण्यापूर्वी ग्राहकाच्या मानेची रचना, शरीराची ठेवण आणि झोपण्याची पद्धत तपासली जाते. त्यानंतर वेगवेगळ्या उंचीच्या उशांवर झोपून पाहण्यास सांगितले जाते. ग्राहकाला कोणत्या प्रकारची उशी अधिक आरामदायी ठरेल, हे निश्चित केल्यानंतर त्यानुसार उशी तयार केली जाते. यामध्ये काळ्या रंगाच्या बिनचोटन चारकोलपासून तयार केलेले छोटे पाइपसारखे दाणे भरले जातात. विपंदीप यांनी सांगितले की, दिवसभर लॅपटॉपवर काम आणि मोबाईलचा वापर यामुळे त्यांच्या मानेवर परिणाम झाला आहे. तसेच वाढत्या वयासोबत झोपेच्या समस्याही जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे चांगली झोप आणि आराम मिळावा, या उद्देशाने त्यांनी या उशीसाठी ४० हजार रुपये खर्च केले.

सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा

विपंदीप यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला. अवघ्या चार तासांत या व्हिडीओला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. काही नेटकऱ्यांनी चांगल्या झोपेसाठी केलेल्या या खर्चाचे समर्थन केले. तर काहींनी एका उशीसाठी ४० हजार रुपये खर्च करण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला. एका युजरने एवढे पैसे खर्च करण्याऐवजी मोबाईलचा वापर कमी करण्याचा सल्लाही दिला. त्यामुळे महिलेच्या या अनोख्या खरेदीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us