72 वर्षीय व्यक्तीच्या फुफ्फुसात आली गाठ, डॉक्टरांनी ऑपरेशन करताच…; ही गोष्ट ऐकून तुम्हीही व्हाल आश्यर्यचकित
एका माणसाच्या फुफ्फुसात ऊतींचा एक गोळा वाढला होता; डॉक्टरांनी तो काढून पाहिला असता, त्यांना त्यामध्ये मानवी दात सापडला—७२ वर्षीय व्यक्तीची ही गोष्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे!

एक विचित्र घटना सध्या व्हायरल होत आहे. ही घटना दाखवून देते की कधी कधी छोटी वाटणारी गोष्ट ही किती मोठी होऊ शकते. आपण अनेकदा छोट्या गोष्टी इग्नोर करतो पण त्याच मोठ्या होतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ७२ वर्षीय वृद्ध व्यक्तीला अनेक महिन्यांपासून सतत खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. वरून वरून ही समस्या छोटी आणि जास्त गंभीर वाटतं नसली तरी हे फारच गंभीर प्रकरण होते. या व्यक्तीची एकंदरीत प्रकृती पाहता, डॉक्टरांना एखाद्या गंभीर आजाराची शंका आली. सुरुवातीच्या तपासणीत त्याला फुफ्फुसात गाठ अर्थात ट्युमर असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अधिक माहितीसाठी त्यांनी त्याचं सीटी स्कॅन सुद्धा केलं, पण नंतर जे समजलं त्याने रुग्णालयातील सर्वजण थक्क झाले.
सीटी स्कॅनमध्ये काय दिसलं?
त्या वृद्ध व्यक्तीचं सीटी स्कॅन केल्यानंतर त्यात असं दिसून आलं की, त्याच्या उजव्या फुफ्फुसाच्या खालच्या भागाकडे जाणारा श्वसनमार्ग पूर्णपणे बंद झाला होता. त्या भागात मोठी सूजही दिसून आली. त्यानंतर, डॉक्टरांनी नेमकं काय झालंय हे स्पष्टपणे बघण्यासाठी ब्रॉन्कोस्कोपीद्वारे श्वसनमार्गाच्या आतील भागाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला.
ब्रॉन्कोस्कोपीच्या तपासणीत काय दिसलं?
ब्रॉन्कोस्कोपी दरम्यान, डॉक्टरांना श्वसनमार्गाच्या आत एक मोठा, सुजलेला आणि लाल रंगाचा गोळा दिसून आला. पहिल्या नजरेत तो एखादी दुर्मिळ गाठ असावी असे वाटले. हा गोळा श्वसनमार्गात अडथळाही निर्माण करत होता. रुग्णाची लक्षणे आणि चाचण्यांचे निकाल पाहता, डॉक्टरांना फुफ्फुसातील गाठीचा संशय आला. त्यांनी तो गोळा काढून श्वसनमार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला. परंतु असे करताना खूप समस्या आल्या.
फुफ्फुसात नेमकं काय सापडलं?
जेव्हा डॉक्टरांनी विशेष उपकरणांच्या साहाय्याने ऑपरेशन करताना सुजलेला भाग काढण्यास सुरुवात केली तेव्हा वेगळंच काही दिसून आलं. त्या प्रोसेस दरम्यान त्यांना त्याखाली एक अत्यंत टणक, पांढरी वस्तू आढळली. ती काळजीपूर्वक बाहेर काढल्यावर असे दिसून आले की, ती गाठीचा भाग नसून प्रत्यक्ष मानवी दात होता. हा दात एका वृद्ध व्यक्तीच्या फुफ्फुसातील श्वसनमार्गामध्ये खोलवर रुतून बसला होता.
तो दात तिथे दीर्घकाळ राहिल्यामुळे, शरीराने त्याच्याभोवती सूज निर्माण झाली होती. परिणामी, तो भाग एखाद्या गाठीसारखा दिसत होता.
तिकडे कसा आला दात?
रुग्णाला विचारल्यानंतर समजले की, एकदा तीन वर्षांपूर्वी तो वृद्ध व्यक्ती अचानक बेशुद्ध पडला होता आणि त्या दरम्यान त्याचा एक दात तुटला होता. मात्र, त्यावेळी तो तुटलेला दात नेमका कुठे गेला, हे कोणाच्याही लक्षात आले नव्हते. आता असे समोर आले आहे की, बेशुद्ध असताना तो दात श्वासमार्गातून थेट फुफ्फुसात जाऊन अडकला होता.
