IND vs NZ : फार कोणाच्या लक्षात नसेल आली अशी न्यूझीलंड दौऱ्यातील टीम इंडियाची सर्वात पॉझिटिव्ह बाजू, उद्याच्या उज्वल भविष्याची चुणूक
IND vs NZ 2nd ODI : न्यूझीलंड टूरमध्ये टीम इंडियासाठी अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये वेगवेगळे चेहरे खेळताना दिसतायत. जी बाजू कमकुवत ठरेल असं वाटलेलं तीच ताकद बनलीय.

टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. टी20 सीरीज भारतीय संघाने 3-2 ने जिंकली. आत वनडे सीरीज सुरु आहे. त्यानंतर कसोटी मालिकेला सुरुवात होईल. न्यूझीलंड दौऱ्यात बीसीसीआच्या सिलेक्शन कमिटीने बऱ्याच खेळाडूंना संधी दिली आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये वेगवेगळे चेहरे खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे टीम एखाद-दुसऱ्या खेळाडूवर अवलंबून नाहीय. न्यूझीलंड दौऱ्यातील टीम इंडियासाठी सर्वात सकारात्मक, पॉझिटिव्ह काय असेल तर ती गोलंदाजी आहे. टी20 मध्ये भारताची गोलंदाजी पाहून अनेक क्रिकेट चाहत्यांना टेन्शन आलं असेल. वेस्ट इंडिज विरुद्ध मायदेशात टी20 मध्ये भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यातही चित्र बदललं नाही. न्यूझीलंड विरुद्ध टी20 सीरीजमध्येही भारतीय गोलंदाजांनी 200 प्लस धावा दिल्या. त्यामुळे जसप्रीत बुमराह शिवाय भारताची गोलंदाजीची बाजू लगडी आहे असं वाटू लागलं होतं.
पण न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीज सुरु होताच भारतीय गोलंदाजांनी कमाल केली आहे. खासकरुन हे सर्व युवा गोलंदाज आहेत. पहिल्या मॅचमध्ये अंशुल कंबोज प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने 10 ओव्हरमध्ये 22 रन्स देऊन दोन विकेट काढले. त्याच्या गोलंदाजीची खासियत म्हणजे त्याने दोन मेडन ओव्हर आणि 60 चेंडूंपैकी 46 निर्धाव चेंडू टाकले. म्हणजे त्याने न्यूझीलंडच्या फलंदाजांना हात मोकळे करुन फटकेबाजीची संधीच दिली नाही. पावसाने व्यत्यय आणलेला हा सामना भारताने डकवर्थ लुईस नियमाने जिंकला. न्यूझीलंडने या मॅचमध्ये 185 धावा केल्या होत्या.
भविष्य उज्वल आहे असंच म्हणावं लागेल
आता दुसऱ्या सामन्यातही भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली. त्यांनी न्यूझीलंडचा डाव 134 धावात संपुष्टात आणला. पावसामुळे हा सामना 50 ऐवजी 47 षटकांचा खेळवण्यात येत आहे. गुरनुर ब्रारने करिअरमधील सर्वोत्तम प्रदर्शन करताना 10 ओव्हरमध्ये 30 धावा देऊन चार विकेट काढल्या. यात दोन मेडन ओव्हर आहेत. अकिब नबीने 7 ओव्हरमध्ये 31 धावा देऊन दोन विकेट काढल्या. अंशुल कंबोजने 8 ओव्हरमध्ये 25 रन्स देऊन दोन विकेट काढले. अर्शदीपला एकही विकेट मिळाला नाही. पण त्याने 7 ओव्हरमध्ये फक्त 16 धावा दिल्या. त्यामुळे टीम इंडियाच्या या युवा बॉलर्सनी टिच्चून गोलंदाजी केली.
भारतीय गोलंदाजांच्या बॉलिंगचा दिशा आणि टप्पा अचूक होता. मायदेशात खेळण्याचा अनुभव असतानाही न्यूझीलंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजीशी जुळवून घेणं जमत नाहीय. वनेडमधील हे सर्व नवीन गोलंदाज आहेत. तुलनेने अनुभव कमी आहे. ही गोलंदाजी पाहिल्यानंतर टीम इंडियाचं भविष्य उज्वल आहे असंच म्हणावं लागेल.
