यापेक्षा भयंकर, अमानवी काय असू शकतं? पॅनिक अटॅक आलेल्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; Indigoचा व्हिडिओ व्हायरल

Indigo Flight Passenger Slapped Video: पॅनीक अटॅक आलेल्या प्रवाशाला एअर होस्टेस मदत करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्याचवेळी दुसऱ्या प्रवाशाने पॅनीक अटॅक आलेल्या प्रवाशाला जोरदार चापट मारली. यानंतर हवाईसुंदर प्रवाशासाठी विनंती करत राहिली.

यापेक्षा भयंकर, अमानवी काय असू शकतं? पॅनिक अटॅक आलेल्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; Indigoचा व्हिडिओ व्हायरल
indigo
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 02, 2025 | 10:32 AM

Indigo Flight Passenger Slapped Video: तुम्ही हा इंडिगो फ्लाईटचा व्हिडिओ पाहिल्यास तुम्हालाही हळहळून येईल. एका प्रवाशाला पॅनीक अटॅक आला. त्याचवेळी हवाईसुंदरी त्याला मदत करत असतानाच एका दुसऱ्या प्रवाशाने पॅनीक अटॅक आलेल्या प्रवाशाला जोरदार चापट मारली. यानंतर एका हवाईसुंदरीने, ‘सर असं करू नका, सर हे योग्य नाही…’ असं वारंवार चापट मारणाऱ्या प्रवाशाला सांगत होती. उपस्थित प्रवाशी देखील चापट मारणं योग्य नाही. तुम्ही असं कुणासोबत वागू शकत नाही,’ असं म्हणताना व्हिडिओत अगदी स्पष्ट दिसत आहे.

नेमका प्रकार काय?

मुंबईहून कोलकात्याला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या 6E-138 या विमानात ही घटना घडली. विमानात एका प्रवाशाने अचानक दुसऱ्या प्रवाशाला चापट मारली. त्यावेळी पीडित प्रवाशाला पॅनिक अटॅक आला होता. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

घटनेचा व्हिडिओ पाहा

 

‘तुम्हाला कोणावरही हात उचलण्याचा अधिकार नाही’

पॅनीक अटॅक आलेल्या प्रवाशाला हवाईसुंदरी मदत करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्याचवेळी दुसऱ्या प्रवाशाने कोणतीही चिथावणी न देता त्याला जोरदार चापट मारली. या घटनेनंतर विमानातील अन्य एका प्रवाशाने आरोपीला वारंवार असे का केले, असे विचारले, त्यावर आरोपीने उत्तर दिले. की, ‘मला याचा त्रास होत होता. मात्र, आणखी एका प्रवाशाने सांगितले की, तुम्हाला कोणावरही हात उचलण्याचा अधिकार नाही.

विमानातील सहप्रवाशाला चापट मारणाऱ्या आरोपीचे नाव हाफिजुल रहमान आहे. त्यानंतर त्याला विमानतळावरील एनएससीबीआय पोलिस ठाण्यात नेण्यात आले, जिथे बिधाननगर पोलिसांनी त्याला अटक केली.

इंडिगो एअरलाइन्सने काय म्हटले आहे?

या घटनेनंतर इंडिगो एअरलाइन्सने अधिकृत निवेदन जारी करून आरोपींच्या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. ‘आमच्या एका विमानात झालेल्या या भांडणाच्या घटनेची आम्हाला माहिती आहे. असे बेशिस्त वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि आम्ही आमच्या प्रवासी आणि क्रूच्या सुरक्षिततेशी आणि प्रतिष्ठेशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही कृत्याचा तीव्र निषेध करतो.’

चापट मारणाऱ्या प्रवाशाला अटक

विमान कोलकात्यात उतरताच आरोपी प्रवाशाची ओळख पटवून त्याला बेशिस्त घोषित करून सुरक्षा यंत्रणांच्या स्वाधीन करण्यात आले, असेही एअरलाइन्सने म्हटले आहे. इंडिगोने म्हटले आहे की, त्यांच्या क्रूने निर्धारित स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार (एसओपी) काम केले आहे आणि सर्व संबंधित नियामक एजन्सींना सूचित केले गेले आहे.

इंडिगोने सर्व ट्रॅव्हल ऑपरेशन्समध्ये सुरक्षितता आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी आपल्या पूर्ण वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. सध्या या प्रकरणी सुरक्षा यंत्रणांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे.