
विवाह हा एक खास क्षण असतो. खासकरून जोडप्यांसाठीचा हा अविस्मरणीय क्षण असतो. त्यासाठी अनेक जोडपे हा क्षण संस्मरणीय करण्यासाठी विविध फंडे वापरतात. विवाह दिमाखदार करण्यासाठी अनेक कल्पना राबवतात. अनेकांच्या विवाहाच्या परंपराही वेगळ्या असतात. त्या परंपरा लक्षात घेऊनच विवाह अविस्मरणीय करण्यासाठी विविध कल्पना वापरल्या जातात. पण इंडोनेशिया आणि मलेशियातील पद्धतच काही वेगळीच आहे. येथील बोर्निओ प्रदेशातील रहिवाशी टिडोंग या जमातीत विवाहाची विचित्र पद्दत आहे. या जमातीत नवरदेव आणि नवरीला तीन दिवस टॉयलेट वापरण्यासाठी दिलं जात नाही. त्यामागे काही परंपरा आहेत. त्यामुळेच वधू आणि वरांना शौचालय वापरायला दिलं जात नाही.
विवाह हा एक पवित्र समारोह आहे, अशी इंडोनेशियातील टीडॉन्ग समुदायातील लोकांची भावना आहे. त्यामुळे रिवाजानुसार नवरदेव नवरीला तीन दिवस शौचालयाला जाऊ दिलं जात नाही. शौचालयात घाण आणि नकारात्मक शक्ती असतात. त्याचा परिणाम वधू वरांवर होऊ शकतो, म्हणून त्यांना तीन दिवस शौचालयात जाऊ दिलं जात नाही.
लग्नानंतर लगेचच वधू आणि वराने शौचालयाचा वापर केला तर त्यांच्यावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडू शकतो, असं टीडॉन्ग समुदायातील लोकांची मान्यता आहे. लग्नानंतर लगेचच शौचालयाला गेल्यावर नवविवाहितांची पवित्रता भंग पावते, असा समजही या समुदायाचा आहे.
याला अपशकून मानलं जातं. असं केल्याने वैवाहिक जीवनात नकारात्मक प्रभाव पडू शकतो. जर नवरदेव आणि नवरीने या ठिकाणाचा वापर केला तर त्यांच्या वाईट नजरेचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात कलह, वाद आणि इतर समस्या येऊ शकतात, अशी या समुदायाची समज आहे.
त्यामुळे वाईट नजरेपासून दूर राहण्यासाठी आणि दाम्पत्य जीवन सुखी होण्यासाठी ही परंपरा पाळणं आवश्यक आहे. ही परंपरा निभावली जावी आणि वधू वरांनी या परंपरेचं पालन करावं म्हणून त्यांना अत्यंत कमी जेवण दिलं जातं. तसेच त्यांना पाणीही अत्यंत कमी दिलं जातं. त्यांना शौचालयाला जाण्याची वेळ येऊ नये म्हणून हे केलं जातं.
दरम्यान, अशा पद्धतीचे रिवाज आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. नवरदेव नवरीने टॉयलेटला जाऊ नये म्हणून त्यांना अन्न आणि पाणी कमी दिलं जातं. पण त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होतो. तीन दिवस हे व्रत पाळल्याने त्यांची तब्येत बिघडू शकते.