
दरवर्षी 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला जातो. आपल्या समाजात बऱ्याचदा महिलांसमोरची आव्हानं, त्यांचा संघर्ष, त्यांचं यश याबद्दल बोललं जातं. ते आवश्यक सुद्धा आहे. पण याच समाजात पुरुषांची फार कमी प्रशंसा होते. पुरुष तो व्यक्ती आहे, जो दिवस-रात्र मेहनत करतो, अपेक्षांचं ओझ वाहतो, जबाबदाऱ्या निभावतो, अनेकदा स्वत:ला सिद्ध करण्यासाठी स्वत:च्या भावना दाबून टाकतो.
अशावेळी पुरुषांचं सुद्धा कौतुक केलं तर त्यांचा सुद्धा आत्मविश्वास, मनोधैर्य वाढतं ते अजून पुढे जाऊ शकतात हे समजून घेणं गरजेच आहे. भले,पुरुष मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करत नाहीत. पण मनातून कुठेतरी त्यांना असं वाटतं असतं की, कोणीतरी त्यांना समजून घेईल. त्यांच्या कामाचं कौतुक करेल. आज या आंतरराष्ट्रीय पुरुष दिवसाच्या निमित्ताने अशा पाच गोष्टी समजून घेऊया, ज्यासाठी पुरुषांचं सुद्धा कौतुक झालं पाहिजे.
पहिला चांगला गुण
पुरुष दरदिवशी आपल्या कुटुंबासाठी कुठला ना कुठला स्ट्रगल करत असतात. नोकरीचा दबाव, पैशांची चिंता आणि करिअरमध्ये चढ-उतार. अशावेळी कोणाला काहीही न बोलता,कोणाला काहीही न सांगता, आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत असतो. लोकांना वाटतं हे त्या पुरुषाचं काम आणि कर्तव्य आहे. भले ती पुरुषाची जबाबदारी असेल. पण यासाठी तुम्ही त्यांच्या स्ट्रगलच कौतुक केलं तर त्यांचं मनोधैर्य आणकी वाढतं.
दुसरा चांगला गुण
बहुतांश लोकांना वाटतं की, पुरुषांना भावना नसतात. खरं हे आहे की पुरुष संवेदना समजून घेतात. पण त्याला प्रदर्शित करत नाहीत. या समाजात पुरुषांना बालपणापासून शिकवलं जातं की, त्यांनी रडायचं नाही, स्वत:ला कमकुवत दाखवायचं नाही. जास्त बोलायचं नाही, अशा काही कारणांमुळे पुरुष आपल्या भावना व्यक्त करत नाहीत. मनातल्या मनात तडफडतात. ते दुसऱ्याचं ऐकतात, समजून घेतात पण आपल म्हणणं मांडू शकत नाही. अशावेळी अनेकांना वाटतं की, पुरुषांच्या मनात भावना नाहीत.
तिसरा चांगला गुण
घर चालवणं हे फक्त पैशांच मॅनेजमेंट नाही. यात मानसिक, भावनात्मक आणि सामाजिक अपेक्षा सुद्धा दडलेल्या असतात. वडिल असो वा पती, भाऊ असो किंवा मुलगा…पुरुष नात्यातील मोठ्या जबाबदाऱ्या स्वत:च्या खांद्यावर घेतात. पण त्याचं क्रेडिट कधी घेत नाहीत. कुटुंबाकडूनही यासाठी त्यांचं फार कमीवेळा कौतुक होतं.
चौथा चांगला गुण
पुरुष शब्दांपेक्षा कृतीमधून आपली काळजी दाखवतात. ते तुम्हाला अभ्यासात, कामात मदत करतात. तुमच्या कामासाठी बाइक घेऊन पळतात. तुमचा मूड पाहून तुमच्या आवडीचं खाणं घेऊन येतात. त्यांच्या या छोट्या-छोट्या गोष्टींसाठी ते कौतुकास पात्र आहेत. पण लोक याकडे ही त्यांची जबाबदारी आहे असं समजून दुर्लक्ष करतात.
पाचवा चांगला गुण
पुरुष स्वभावाने कणखर असतात असा समाजाने बनवलेला एक कॉन्सेप्ट आहे. भले आतून ते कितीही कोलमडलेले असले तरी. आपण किती कणखर आहोत हे दाखवण्यासाठी पुरुष कधी कोणाला काही बोलत नाहीत. त्यांना कोणी जज करु नये यासाठी ते आपल्या कमकुवत बाजू लपवतात.