आई गेल्यानंतर तिच्या हातचं शेवटचं जेवण 5 वर्षे फ्रीजरमध्ये ठेवलं, नंतर ते खाताच वडील आणि मुलगी…

आईने खास पदार्थ बनवला अन् काही वेळातच अचानक झालं निधन. पण तिच्या आईच्या हाताची चव चाखण्यासाठी तो पदार्थ 5 वर्षे फ्रीजमध्ये ठेवला. पण जेव्हा ते त्यांनी खाल्ले तर दोघे झाले भावूक.

आई गेल्यानंतर तिच्या हातचं शेवटचं जेवण 5 वर्षे फ्रीजरमध्ये ठेवलं, नंतर ते खाताच वडील आणि मुलगी...
| Updated on: Aug 23, 2026 | 5:08 PM

आपल्या जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर तिची एखादी छोटीशी वस्तूही मोठी आठवण बनते. जपानमधील मिझुकी तकाराया आणि त्यांच्या वडिलांनीही आईच्या आठवणीची अशीच एक अनोखी निशाणी तब्बल पाच वर्षे जपून ठेवली. आईने कुटुंबासाठी प्रेमाने बनवलेली ‘बुता नो काकुनी’ ही पारंपरिक जपानी पोर्क डिश त्यांनी पाच वर्षे फ्रीजरमध्ये सुरक्षित ठेवली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही डिश बनवल्यानंतर अवघ्या काही तासांत मिझुकी यांच्या आईला अचानक ब्रेन हेमरेज झाला आणि त्यांचे निधन झाले. आईच्या हातचे ते शेवटचे जेवण असल्याने मिझुकी आणि त्यांच्या वडिलांना ते खाणेही शक्य नव्हते आणि फेकून देण्याची कल्पनाही त्यांना सहन होत नव्हती. अखेर त्यांनी ती डिश फ्रीजरमध्ये ठेवली.

पाहता पाहता एक-दोन नाही तर तब्बल पाच वर्षे हे जेवण फ्रीजरमध्येच राहिले. कालांतराने ती डिश केवळ अन्न न राहता त्यांच्या आईच्या आठवणींचा एक भावनिक ठेवा बनली. फ्रीजर उघडताना त्यांना आईने कुटुंबासाठी केलेल्या त्या शेवटच्या जेवणाची आठवण होत असे.

पाच वर्षांनंतर मिझुकी यांच्या मनात आईच्या हातच्या त्या पदार्थाची चव पुन्हा अनुभवण्याची इच्छा निर्माण झाली. त्यासाठी त्यांनी जपानमधील लोकप्रिय ‘तांतेई नाइट स्कूप’ या टीव्ही शोची मदत घेतली. शोच्या टीमने एका विद्यापीठातील प्राध्यापक आणि व्यावसायिक शेफच्या मदतीने या जुन्या डिशची तपासणी केली.

तो पदार्थ चाखल्यानंतर दोघे भावूक

तपासणीदरम्यान जुन्या पदार्थात काही बॅक्टेरिया आढळल्याने तो थेट खाणे सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तज्ज्ञांनी उच्च तापमान आणि प्रेशर कुकिंगसारख्या पद्धतींचा वापर करून मूळ पदार्थाची चव पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न केला. शेफने जुन्या डिशमधील घटक, चव आणि बनवण्याची पद्धत यांचा अभ्यास करून त्याच धाटणीचा पदार्थ तयार केला.

अखेर पाच वर्षांनंतर आईच्या हातच्या त्या शेवटच्या जेवणाची आठवण पुन्हा चवीच्या माध्यमातून पिता-पुत्रीसमोर आली. दोघांनी तो पदार्थ चाखल्यानंतर ते भावुक झाले. आईने बनवलेल्या पदार्थासारखीच चव असल्याचे त्यांनी सांगितले. त्या क्षणी त्यांच्यासाठी ती केवळ जेवणाची प्लेट नव्हती, तर आईच्या आठवणींना पुन्हा एकदा अनुभवण्याचा भावनिक क्षण होता. सध्या मिझुकी आणि त्यांच्या वडिलांची ही कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us