लाखोंची स्वप्नं सोडून जंगल निवडलं… प्रेमासाठी अमेझॉनमध्ये रमला हा तरुण, हटके लव्ह स्टोरी व्हायरल

अमेरिकेतील 23 वर्षीय जस्टिन अल्वो याने प्रेमापोटी आधुनिक जीवन सोडून इक्वाडोरच्या अमेझॉन वर्षावनात शुआर आदिवासी समुदायासोबत राहण्याचा निर्णय घेतला. मारियासोबतच्या लग्नानंतर जस्टिनने शहरी सुखसोयींचा त्याग करून निसर्ग आणि आदिवासी संस्कृतीचा स्वीकार केला. तो आपल्या अनुभवांची झलक YouTube द्वारे जगासोबत शेअर करतो, जिथे तो जंगल जीवन, परंपरा आणि समुदायाबद्दल माहिती देतो. त्यांची अनोखी कहाणी अनेकांना प्रेरणा देत आहे.

लाखोंची स्वप्नं सोडून जंगल निवडलं… प्रेमासाठी अमेझॉनमध्ये रमला हा तरुण, हटके लव्ह स्टोरी व्हायरल
प्रेमासाठी अमेझॉनमध्ये रमला हा तरुण
| Updated on: Jul 23, 2026 | 11:52 AM

प्रेम माणसाला कोणतेही पाऊल उचलायला भाग पाडू शकते, असे अनेकदा म्हटले जाते. कोणी प्रेमासाठी देश बदलतो, तर कोणी आपले करिअर सोडतो. मात्र, प्रेम खरंच माणसाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतं, याची कल्पना कदाचित अमेरिकेतील जस्टिन अल्वोची कहाणी ऐकल्यावर येईल. अमेरिकेतील अवघ्या 23 वर्षीय जस्टिन अल्वो याने प्रेमासाठी केवळ जीवनशैलीच बदलली नाही, तर आधुनिक जगातील सुखसोयींना दूर सारून अमेझॉनच्या घनदाट जंगलात नवं आयुष्य सुरू केले. ज्या वयात तरुण मोठ्या शहरांमध्ये करिअर, पैसा आणि आरामदायी आयुष्याच्या मागे धावत असतात, त्याच वयात जस्टिनने वेगळाच मार्ग निवडला. त्याने शहरातील गजबज, आधुनिक सोयी-सुविधा आणि ओळखीचे जग मागे सोडले… आणि थेट अमेझॉनच्या दाट जंगलात जाऊन एका आदिवासी समुदायासोबत राहण्याचा निर्णय घेतला.

कारण होतं— प्रेम. आज जस्टिन आपल्या पत्नी मारियासोबत इक्वाडोरच्या अमेझॉन वर्षावनात शुआर आदिवासी समुदायामध्ये राहतो. जंगलातील साधे जीवन, निसर्गाशी असलेले नाते आणि आदिवासी संस्कृतीचा अनुभव तो जगासोबत शेअर करतो.

एका भेटीने बदललं संपूर्ण आयुष्य

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, इक्वाडोरमध्ये 23 वर्षांच्या जस्टिनची भेट मारियाशी झाली. मारिया शुआर समुदायातील असून त्या वेळी एका अमेझॉनियन रेस्टॉरंटमध्ये शेफ म्हणून काम करत होती. दोघांमध्ये आधी मैत्री झाली, त्यानंतर प्रेम फुलले आणि अखेर त्यांनी लग्न केले. जस्टिनचा अमेझॉनशी संबंध मात्र यापूर्वीपासूनच होता. त्यांचे वडील लहानपणी इक्वाडोरमधील एका दुर्गम आदिवासी भागात राहिले होते. त्यामुळे जस्टिनला या भागाबद्दल आधीपासूनच एक वेगळे आकर्षण होते. आता हे जोडपं पूर्व इक्वाडोरमधील अमेझॉन वर्षावनात राहते. दोघेही आपले दैनंदिन जीवन आणि आदिवासी संस्कृतीची झलक आपल्या यूट्यूब चॅनेलवर दाखवतात.

वडिलांमुळे पोहोचला अमेझॉनमध्ये

खरंतर जस्टिन हा अमेरिकेत वाढलेला तरूण आहे. मात्र, त्यांचा अमेझॉनशी एक खास संबंध आहे. त्यांचे वडील लहानपणी इक्वाडोरमधील एका दुर्गम आदिवासी भागात राहिले होते. त्यामुळे त्याला या प्रदेशाबद्दल आधीपासूनच कुतूहल होते.
पण प्रत्यक्ष जंगलात पोहोचल्यानंतर त्याला जाणवले की हे त्याच्या कल्पनेपेक्षा पूर्णपणे वेगळे जग आहे. चारही बाजूंनी पसरलेले घनदाट जंगल… अनोळखी आवाज… धोकादायक प्राणी… आणि जगण्याचे वेगळे नियम.

सुरुवातीला मला भीती वाटायची. कोणती वनस्पती विषारी आहे, कोणत्या कीटकांपासून धोका आहे आणि कोणत्या सापापासून जीवाला धोका होऊ शकतो, याची काहीच माहिती नव्हती, असं जस्टिनने सांगितलं. पण शुआर समुदायाने त्याला स्वीकारले. त्यांनी त्याला जंगल वाचायला शिकवले… निसर्गाचा आदर करायला शिकवला… आणि या अनोख्या जगाचा एक भाग बनवलं.

सापाला स्पर्श आणि अनोखी शिक्षा

मात्र, जंगलातील जीवन शिकताना जस्टिनकडून एक चूक झाली. समुदायाच्या इशाऱ्यानंतरही त्याने एका बोआ सापाला स्पर्श केला. शुआर लोक या सापाला आध्यात्मिकदृष्ट्या पवित्र मानतात. त्यांच्या परंपरेनुसार, सापाला स्पर्श केल्यामुळे जस्टिनवर नकारात्मक ऊर्जा आली होती. त्यामुळे त्याला काही काळ गर्भवती महिलांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आणि धार्मिक विधीद्वारे ही ऊर्जा दूर करण्याची प्रक्रिया करण्यात आली. जस्टिनसाठी हा अनुभव वेगळा आणि अविस्मरणीय होता.

ज्यांना तो परका वाटला, तेच नंतर जवळचे झाले

मारियाच्या कुटुंबातील अनेकांनी जस्टिनचे मनापासून स्वागत केले. त्याचा आदिवासी संस्कृतीबद्दलचा आदर आणि शिकण्याची इच्छा त्यांना आवडली. पण काही लोकांना सुरुवातीला शंका होती. एका परदेशी व्यक्तीवर विश्वास ठेवणे त्यांच्यासाठी सोपे नव्हतं. तो कोणत्यातरी चुकीच्या हेतूने तिथे आला आहे का, अशी भीती काहीलोकांना होती. मात्र, काळ जसजसा पुढे गेला तसतसा जस्टिनने आपल्या प्रेमाने आणि प्रामाणिकपणाने सर्वांची मने जिंकली.

चिचाचा पहिला घोट… आणि आयुष्यभराची आठवण

अमेझॉनमधील चिचा हे पारंपरिक पेय जस्टिनसाठी एक मोठा सांस्कृतिक धक्का होता. कसावापासून तयार होणारे हे पेय बनवण्याची पद्धत त्याच्यासाठी पूर्णपणे नवीन होती. पहिल्यांदा चिचा प्यायल्यानंतर त्याची तब्येत इतकी खराब झाली की त्याला तीव्र पोटदुखी आणि त्रास सहन करावा लागला. पण पाहुण्याने चिचा नाकारणे म्हणजे यजमानाचा अपमान मानला जात असल्याने त्याने ही परंपरा स्वीकारली. आज मात्र दीड वर्षाच्या अनुभवांनंतर चिचा त्याच्या आवडीच्या गोष्टींपैकी एक बनली आहे.

जस्टिनच्या या वेगळ्या आयुष्यात त्याचा एक अनोखा साथीदारही आहे — जेवलीना नावाचा जंगली पेक्करी. लहान जंगली डुकरासारखा दिसणारा हा प्राणी जस्टिनच्या खूप जवळचा आहे. “हा जगातील सर्वात गोंडस प्राणी आहे,” असे जस्टिन म्हणतो. मात्र, मोठा झाल्यावर त्याचे वजन सुमारे 40 किलोपर्यंत वाढू शकते, याची त्याला जाणीव आहे.

आज जस्टिन आणि मारिया अमेझॉनच्या जंगलात आनंदाने आपले जीवन जगत आहेत. याच वर्षी त्यांच्या कुटुंबात एका बाळाचेही आगमन झालं. ज्या व्यक्तीने कधीकाळी शहरातील आरामदायी आयुष्य जगले, तो आज जंगलातील साधेपणात समाधान शोधत आहे. त्यांची ही कहाणी सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाली असून अनेकांना हे कपल आवडलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us