
पश्चिमी उत्तर प्रदेशातील मेरठ येथील सरदार वल्लभभाई पटेल कृषी विद्यापीठात अखिल भारतीय शेतकरी मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. येथे पाळीव प्राण्यांचा पण मेळा भरला आहे. मुऱ्हा जातीचा रेडा सध्या भाव खात आहे. त्याचे नाव सरपंच असे आहे. त्याने साडेचार वर्षांच्या वयातच 15 हून अधिक ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्याची किंमत ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 14 कोटी रुपये इतकी या रेड्याची किंमत आहे.
14 कोटी रुपये किंमत
मुझ्झफरनगरमधील राहुल देवा हे या सरपंच रेड्याचे मालक आहेत. हा रेडा खरेदीसाठी अनेकांनी बोली लावली आहे. देवा यांच्या मते सर्वात ताजा आकडा 14 कोटी रुपये इतका आहे. तरीही देवा यांना त्यांचा हा रेडा विक्री करायचा नाही. या किंमतीत तर तीन फेरारी कार येतील. महागडी BMW कार येईल. पण देवा यांना त्याची विक्री करायची नाही. अवघ्या साडेचार वर्षात हा रेडा आतापर्यंत 15 मेळ्यांमध्ये टक्करीत जिंकला आहे. त्याने 15 चषक त्याच्या नावे केले आहेत. सरपंचाच्या आईचे नाव पार्वती तर वडिलांचे नाव बिर्ला आहे. सरपंचासोबत या पाच रेडे आणि पाच म्हशी असा हा परिवार आहे. त्यांचे ब्रीडही एकदम चांगले आहे.
वार्षिक लाखोंची कमाई
राहुल देवा यांच्या माहितीनुसार, या रेड्याचे वीर्य विक्रीतून त्यांना वर्षाला लाखोंचा फायदा होतो. या वीर्याचा वापर करून इतर लोक चांगल्या म्हशीची आणि रेड्याची पैदास करतात आणि त्याचा दूध व्यवसायाला आणि शेती कामासाठी मदत होते. देशभरातील अनेक लोक सरपंचाचे वीर्य खरेदी करण्यासाठी येतात. या सरपंचाला रोज दूध, कॅल्शियम, पोष्टिक आहार आणि ड्राय फ्रुट्सचा खुराक देण्यात येतो. त्यामुळे तो सहसा आजारी पडत नाही.
सरपंच नाव पडले कसे?
कोणत्याही प्राण्याचा जन्म होतो तेव्हा नवजात प्राण्याला त्याच्या पायावर उभं राहायला जवळपास एक तास लागतो. पण सरपंच जन्माल्या बरोबर त्याच्या पायावर उभा राहिल्याची माहिती राहुल देवा यांनी दिली. त्यामुळे त्याचे नाव सरपंच असे ठेवण्यात आल्याचे ते म्हणाले. या रेड्याची ते मुलासारखी काळजी घेतात.