
आजकाल अनेक मिडल क्लास घरांमध्ये मायक्रोवेव्हचा वापर वाढला आहे. अन्न पटकन गरम होणे, काही गोष्टी कमी वेळात तयार होणे यामुळे याचे महत्त्व वाढले आहे. मात्र, मायक्रोवेव्हचा वापर जितका फायदेशीर आहे, तितकाच काळजीपूर्वक तो वापरणे गरजेचे आहे. विशेषतः तो घरात कुठे ठेवायचा याकडे दुर्लक्ष केल्यास ते तुमच्यासाठी मोठा धोका ठरू शकतो. चुकीच्या ठिकाणी मायक्रोवेव्ह ठेवणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे.
खूप जण मायक्रोवेव्ह थेट गॅस चूल्याजवळ ठेवतात. पण ही मोठी चूक आहे. गॅस स्टोव्हमधून निघणारी गरम हवा मायक्रोवेव्हच्या बाहेरील बॉडीला आणि आतल्या सर्किटला इजा पोहोचवते. यामुळे ओव्हरहीटिंग किंवा शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो. शिवाय, इलेक्ट्रॉनिक सिस्टम पूर्णपणे फेल होऊ शकतो.
मायक्रोवेव्ह कधीही वॉश बेसिन, सिंक किंवा इतर कोणत्याही पाण्याच्या स्त्रोताजवळ ठेवू नये. मायक्रोवेव्ह हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे आणि पाण्याच्या थेंबांमुळे शॉक लागण्याची किंवा शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. थोडीशी सांडलेली पाणी सुद्धा मशीन खराब करू शकते आणि जीवाला धोका पोहोचू शकतो.
घरात जागेची कमतरता असल्यामुळे अनेक वेळा मायक्रोवेव्ह फ्रिज किंवा इतर उपकरणांच्या वर ठेवला जातो. पण हे अत्यंत चुकीचे आहे. कारण फ्रिजसारख्या उपकरणांमधून वायब्रेशन आणि उष्णता निर्माण होते. याचा परिणाम मायक्रोवेव्हच्या कार्यक्षमतेवर होतो. या दोन्ही उपकरणांचे आयुष्य कमी होण्याची शक्यता असते.
अनेकदा घरात सौंदर्यासाठी मायक्रोवेव्ह किचन कॅबिनेटमध्ये बसवला जातो. पण जर त्या जागेत योग्य व्हेंटिलेशन नसेल, तर मायक्रोवेव्ह ओव्हरहीट होतो. मायक्रोवेव्ह वापरताना त्यातून गरम हवा बाहेर पडायला मोकळी जागा असणे आवश्यक आहे. त्यामुळे मायक्रोवेव्हच्या आजूबाजूला किमान 5-6 इंच जागा ठेवावी.
मायक्रोवेव्ह कधीही अशा ठिकाणी ठेवू नका जिथे लहान मुले सहज पोहोचू शकतात. खेळता खेळता ते मशीन सुरू करू शकतात, ज्यामुळे अपघात किंवा भाजण्याचा धोका वाढतो. त्यामुळे तो शक्यतोवर उंचावर किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवा.
थोडक्यात सांगायचं झालं तर, मायक्रोवेव्ह घरात असणं फायद्याचं जरूर आहे, पण त्याचा उपयोग योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी केला गेला पाहिजे. चुकीच्या जागेवर ठेवलेला मायक्रोवेव्ह फक्त तुमच्या स्वयंपाकघराला नाही, तर तुमच्या संपूर्ण घराला धोका ठरू शकतो. त्यामुळे आजच एक नजर टाका तुमचं मायक्रोवेव्ह सुरक्षित जागी आहे का?