
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला मोठा धक्का मिळाला आहे. 6 मेच्या मध्यरात्रीपासून सुरु झालेलं ‘ऑपरेशन सिंदूर’ हे 8 मेपर्यंत सुरुच होतं. भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या एकामागोमाग बॉम्बस्फोटाच्या मालिकांमुळे पाकिस्तान पूर्णपणे हादरला आहे. याचा परिणाम आता शेअर बाजारावरही पडला आहे. बुधवारी सकाळी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह उघडले, परंतु काही काळानंतर ते पुन्हा उसळी घेत घसरणीतून सावरले. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी बाजारात केलेल्या सर्वांगीण खरेदीमुळे दोन्ही निर्देशांक वाढीसह बंद झाले. त्याच वेळी, भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानी शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळले. भारत-पाकिस्तान तणावाचा देशांतर्गत शेअर बाजारांवर फारच मर्यादित परिणाम झाला.
पाकिस्तानच्या शेअर मार्केटमध्ये भूकंप
कराचीजवळ भारतीय लष्करी कारवाईच्या अफवांनंतर गुरुवारी पाकिस्तानचा शेअर बाजार सहा टक्क्यांहून अधिक घसरला आणि तासभर व्यापार थांबवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. व्यवहार थांबवण्यापूर्वी KSE100 निर्देशांक 6,948.73 अंकांनी किंवा 6.32 टक्क्यांनी घसरून 1,03,060.30 वर आला. भू-राजकीय परिस्थितीमुळे गुंतवणूकदार घाबरत असल्याने परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असेही म्हटलं जात आहे. 2021 नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. मात्र नंतर त्यात थोडी सुधारणा होत 3521 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. एकंदरितच आता पाकिस्तानवर आर्थिक संकट आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.
भारताला मात्र फायदा
भारत- पाकिस्तान तणावा असूनही, पाकिस्तानच्या शेअर बाजाराची जरी परिस्थिती खालावली असली तर भारताला मात्र याचा फायदा झाला आहे. कारण भारतीय बाजारपेठा स्थिर राहिल्या आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक वाढवली आहे. मे महिन्यात आतापर्यंत 7,062 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
भारताला शेअर मार्केटमध्ये मिळालेला फायदा काय?
भारत आणि यूके यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे बाजारपेठेला एक मजबूत पाया मिळाला. एफटीएच्या परिणामामुळे विशेषतः ऑटो सेक्टरच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
अनेक मोठ्या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले आहेत, यामुळे गुंतवणूकदारांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे.
जागतिक बाजारपेठा अमेरिकन फेडने व्याजदर कपात करण्याकडे लक्ष देत आहेत, यामुळे देखील वाढ होऊ शकते.
ट्रम्प यांनी टॅरिफ सवलत दिल्याने आणि अमेरिका-चीन व्यापार तणाव कमी झाल्यामुळे जागतिक बाजारपेठेत सकारात्मक भावना दिसून येत आहेत.
विश्लेषक काय म्हणतात?
बाजार विश्लेषकांच्या मते, सीमापार दहशतवादी नेटवर्क्सविरुद्ध लष्करी कारवाईनंतर बाजारात व्यापारादरम्यान चढ-उतार दिसून आले असले तरी, अखेर अनिश्चितता दूर झाली. भारत-पाकिस्तान युद्धाशी संबंधित तणावामुळे बाजारातील गुंतवणूकदार सावध राहतील आणि व्यवहार सावधानतेच होतील. परंतु पुढील काही दिवसांत स्टॉक-विशिष्ट क्रियाकल्पांसह बाजारात अस्थिरता दिसून येऊ शकते.