काय सांगता? सरकार वाटतंय फुकट सोनं, प्रत्येकाला मिळतंय तब्बल… व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Free Gold Fact Check : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये केंद्र सरकार ज्या कुटुंबांचा सदस्य सरकारी नोकरीत नाही अशा कुटुंबांना एक तोळा (10 ग्रॅम) सोने मोफत देण्यात येत आहे. याची सत्यता जाणून घेऊयात.

काय सांगता? सरकार वाटतंय फुकट सोनं, प्रत्येकाला मिळतंय तब्बल... व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?
Free Gold Fact Check
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 05, 2026 | 6:06 PM

भारतात सोन्याचे दर गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार मनात आला तरी अनेकांना घाम फुटतो. अशाचत आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये केंद्र सरकार ज्या कुटुंबांचा सदस्य सरकारी नोकरीत नाही अशा कुटुंबांना एक तोळा (10 ग्रॅम) सोने मोफत देण्यात येत आहे. तसेच या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेची घोषणा करत असल्याचेही पहायला मिळत आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ही बातमी खरी की खोटी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सरकार सोनं वाटणार?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ sanjay_annu_sahu नावाच्या अकाउंटने इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यात असे म्हटले आहे की, आधार कार्डच्या मदतीने सोने वाटले जाईल. पण हा दावा खरा आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशातच आता केंद्र सरकारची संस्था असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) च्या फॅक्ट चेक युनिटने या प्रकरणाची चौकशी केली असून सत्या लोकांच्या समोर मांडले आहे.

PIB ने काय म्हटले?

PIB फॅक्ट चेकने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबत एक पोस्ट केली आहे. यात पीआयबीने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले आहे. PIB ने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, व्हिडिओमध्ये दाखवलेले भाषण AI तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले आहे. हे समाजात अशांतता निर्माण करण्यासाठी व्हायरल केला जाच आहे. कारण केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना जाहीर केलेली नाही. हा दावा खोटा आहे.

PIB ने सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा खोट्या दाव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. तसेच कोणत्याही सरकारी योजनेची माहिती केवळ अधिकृत स्त्रोतांकडूनच जाणून घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ज्या गोष्टीची माहिती नाही असे मेसेज शेअर करणे टाळा असंही PIB ने म्हटले आहे.

खोट्या मेसेजची तक्रार कुठे करायची?

तुम्हाला सरकारच्या नावाने सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्यांबद्दल शंका असेल, तर तुम्ही माहिती जाणून घेण्यासाठी PIB फॅक्ट चेकची मदत घेऊ शकता. अशा बातम्यांचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा संबंधित URL थेट PIB फॅक्ट चेकला पाठवू शकतो. यासाठी 8799711259 हा व्हॉट्सअॅप नंबर किंवा factcheck@pib.gov.in या ईमेल आयडीचा वापर करा.

PIB फॅक्ट चेक युनिट 2019 पासून खोट्या बातम्यांवर नजर ठेवून आहे. आतापर्यंत हजारो बनावट बातम्यांचे खंडन केले आहे. बनावट सरकारी योजनांचा खोटा प्रसार करून दिशाभूल करणाऱ्या लोकांवर आळा घालण्याचे पीआयबीचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.