रिंकी आणि पिंकीचा एकाच मुलासोबत विवाह, नवरदेव आला गोत्यात; पाहा कायदा काय सांगतो?

| Updated on: Dec 04, 2022 | 10:03 PM

सोशल मीडियावर सध्या एका लग्नाची चांगलीच चर्चा आहे. पण आता हे लग्न दुसऱ्या एका कारणामुळे पुन्हा चर्चेत आलं आहे. पाहा काय आहे कारण.

रिंकी आणि पिंकीचा एकाच मुलासोबत विवाह, नवरदेव आला गोत्यात; पाहा कायदा काय सांगतो?
Follow us on

रवी लव्हेकर, सोलापूर : अनोख्या विवाहाच्या चर्चा तुम्हीही याआधी ऐकल्या असतील. पण सोलापुरातील एक विवाह जरा जास्तच आगळा-वेगळा होता. कारण दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलासोबत लग्नगाठ बांधली. यानंतर ही बातमी इतकी व्हायरल झाली की नवरदेव आता गोत्यात सापडला.

लग्नाचा फोटो दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत राहिला. एक वर आणि दोन वधू. दोन जुळ्या बहिणींनी आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून एकाच व्यक्तीची निवड केली. मोठ्या थाटामाटात लग्न देखील केलं. पण लग्नाचा आनंद काही जास्त काळ टिकला नाही.

जन्म, शिक्षण आणि नोकरी हे टप्पे एकत्र पार पाडल्यानंतर त्यांनी लग्नाच्या बाबतीत ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही बहिणी कांदिवलीच्या राहणाऱ्या. दोघीही उच्चशिक्षित. इंजिनिअर असलेल्या दोन्ही बहिणींनी मात्र टॅक्सी चालकासोबत लग्न करण्याचा निर्णय़ घेतला.

रिंकी आणि पिंकी यांची आई आजारी पडली तेव्हा अतुल नावाच्या या टॅक्सी चालकाने त्यांच्या आईला रुग्णालयात दाखल केला. या कठीण काळात अतुलने त्यांना साथ दिली. त्यामुळे त्याच्या या स्वभावामुळे दोन्ही बहिणी त्याच्या प्रेमात पडल्या.

दोन्ही बहिणींसोबत विवाह केल्यानंतर अतुल मात्र आता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. एक पत्नी हयात असताना दुसऱ्या पत्नीसोबत विवाह करणं हा कायद्याने गुन्हा आहे.

सोशल मीडियावर या लग्नावरुन अनेक मीम्स देखील व्हायरल होत आहेत. एकीकडे लग्नाला एक मुलगी मिळत नसताना अतुलला दोन मुली मिळाल्या यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.