विमान हवेत असतानाच दरवाजा उघडला, विमानात होते 200 प्रवासी, भयंकर व्हिडीओ व्हायरल

हवेत 700 फूट उंचीवर विमान असताना त्याचा दरवाजा उघडल्याने प्रचंड वारा आत शिरून प्रवाशांचे केस, वस्तू उडवताना दिसत आहे. त्यामुळे घाबरलेले प्रवासी किंचाळताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

विमान हवेत असतानाच दरवाजा उघडला, विमानात होते 200 प्रवासी, भयंकर व्हिडीओ व्हायरल
Asiana Airlines
Image Credit source: socialmedia
| Updated on: May 26, 2023 | 8:18 PM

मुंबई : विमान प्रवाशांद्वारे विविध प्रकाराचे कारनामे केल्याने विमानातील इतर प्रवाशांवर संकट ओढवण्याचे प्रकार अलिकडे वारंवार घडत आहेत. आता एका विमानाच्या प्रवाशाने विमान लॅंडींग होत असतानाच अचानक विमानाचा आपात्कालिन दरवाजा उघडल्याचा धक्कादायक प्रकार साऊथ कोरीयात घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत असून विमानातील प्रवाशांची अवस्था पाहून अंगावर अक्षरश: काटा येत आहे. या घटनेत काही प्रवासी गुदमरल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एशियाना एअरलाईन्सचे एअरबस A321-200 हे विमान 194 प्रवाशांना घेऊन जात होते. साऊथ कोरीयाच्या जेऊच्या साऊदर्न आयलॅंड येथून देएगू विमानतळावर हे विमान उतरत असताना विमान 700 फूट उंचीवर असताना शुक्रवारी अचानक एका प्रवाशाने इमर्जन्सी दरवाजाच्या हॅंडल दाबल्याने दरवाजा उघडला गेला. या विमानाच्या इतर प्रवाशांनी त्या प्रवाशाला असे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तरीही दरवाजाची फटीतून हवेचा दाब आल्याने दरवाजा उघडला गेला. त्यामुळे ऑनबोर्ड असलेल्या 194 प्रवाशांची धांदल उडाली. त्यात अनेक टीनेजर एथलीट होते. त्यांना उल्सान येथील विकेण्ड स्पर्धांना जायचे होते. त्यांना याचा फटका बसला.

हा पाहा व्हिडीओ..

दरवाजा का उघडला ते सांगितले नाही !

विमानाचा दरवाजा उघडा असतानाच विमानाला सुरक्षित लॅंडींग करण्यात यश आल्याचे साऊथ कोरीयाच्या वाहतूक मंत्र्यांनी सांगितले. डझनभर प्रवाशांना जखमा झाल्या असून अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यातील नऊ जणांना स्थानिक रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे योनहाप वृत्तसंस्थेने म्हटले आहे. दरवाजाजवळी अनेक प्रवासी बेशुद्ध पडल्याने विमानात गोंधळ माजला.त्यामुळे डॉक्टरांना पाचारण करावे लागल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी ज्या प्रवाशाने दरवाजा उघडला त्याला ताब्यात घेतले आहे. त्याने असे का केले हे मात्र त्याने सांगितलेले नाही. या 30 वर्षीय संशयिताची डेएगू इंटरनॅशनल एअरपोर्ट पोलिस चौकशी करीत आहेत.