देशातील अनोख गाव, जेथील लोकांना अंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लागत नाही पासपोर्ट आणि व्हिसा, कारण…

भारतामधील असं एक गाव जेथील लोकांना अंतरराष्ट्रीय प्रवास करण्यासाठी कोणत्याही पासपोर्ट आणि व्हिसाची गरज नाही. कुठे आहे हे गावं?

देशातील अनोख गाव, जेथील लोकांना अंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लागत नाही पासपोर्ट आणि व्हिसा, कारण...
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 04, 2026 | 6:51 PM

कधी तुम्ही असा विचार केला आहे का की, एकाच गावात राहून दोन देशांत एकाच वेळी वास्तव्य करता येऊ शकते? की तुमच्या घराचा एक भाग भारतात आणि दुसरा भाग थेट म्यानमारमध्ये असेल? हे ऐकायला जरी अविश्वसनीय वाटत असले तरी भारताच्या ईशान्येकडील नागालँड राज्यात असलेले लोंगवा गाव हे वास्तव अनुभवायला मिळते.

नागालँडच्या मोन जिल्ह्यात हिरव्यागार डोंगररांगांमध्ये वसलेले लोंगवा गाव भौगोलिकदृष्ट्या अत्यंत वेगळं आणि जगातल्या सर्वात अनोख्या सीमावर्ती गावांपैकी एक मानलं जातं. कारण भारत–म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमा थेट या गावाच्या मधून जाते. येथे सीमा नकाशावर नाही तर थेट लोकांच्या अंगणातून, घरांमधून आणि दैनंदिन जीवनातून जाते.

एक पाऊल भारतात दुसरं म्यानमारमध्ये

लोंगवा गावाची सर्वात मोठी खासियत म्हणजे इथली भौगोलिक रचना. गावातील अनेक घरं अशी आहेत की घराचा एक भाग भारतात तर दुसरा भाग म्यानमारच्या हद्दीत येतो. स्थानिक लोकांसाठी ही बाब काही नवीन नाही. अनेक पिढ्यांपासून ते अशाच प्रकारे राहतात आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात सीमा ही अडथळा न ठरता एक स्वाभाविक गोष्ट बनली आहे.

या गावातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे येथील पारंपरिक मुखियाचं घर. स्थानिक भाषेत मुखियाला अंग असं संबोधलं जातं. विशेष म्हणजे, अंग यांचं घर नेमकं भारत–म्यानमार सीमेवर उभं आहे. असं म्हणतात की, या घरात बसून एका छताखाली दोन देशांत एकाच वेळी उपस्थित असल्याचा अनुभव घेता येतो. याच कारणामुळे लोंगवा गाव जगभरातील पर्यटक आणि संशोधकांसाठी कुतूहलाचा विषय ठरलं आहे.

सीमारेषा असूनही मोकळा श्वास

सामान्यतः भारत आणि म्यानमारदरम्यान प्रवासासाठी पासपोर्ट आणि व्हिसा आवश्यक असतो. मात्र लोंगवा सारख्या सीमावर्ती भागांतील स्थानिक समुदायांना अनेक वर्षांपासून परंपरागत आवाजाहीची सवलत दिली गेली आहे. नातेवाईकांना भेटणे, सामाजिक कार्यक्रम, शेती आणि दैनंदिन गरजांसाठी लोक मर्यादित अंतरापर्यंत सीमा ओलांडतात. मात्र बाहेरील पर्यटकांसाठी येथे प्रवेश करताना प्रशासनाची परवानगी आवश्यक असते.

सामान्य पर्यटनस्थळांपेक्षा काहीतरी वेगळं पाहण्याची इच्छा असलेल्या प्रवाशांसाठी लोंगवा गाव एक अविस्मरणीय अनुभव ठरते. येथे केवळ दोन देशांची सीमा पाहायला मिळत नाही तर कोन्याक नागा जमातीची समृद्ध आणि अनोखी संस्कृती, त्यांची पारंपरिक घरं, वेशभूषा आणि जीवनशैली जवळून अनुभवता येते.