92 जणांना घेऊन जाणारे विमान अचानक झाले गायब, थेट 35 वर्षांनी अचानक झाले लँडिंग, आतले दृश्य पाहून हादरले अधिकारी
92 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान अचानक झाले गायब. थेट 35 वर्षांनी अचानक ब्राझीलमध्ये उतरले. सुरक्षा रक्षकांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता त्यांना बसला मोठा धक्का. ते थेट बाहेर पडले अन्...

जर्मनीतून उड्डाण केलेले आणि 92 जणांना घेऊन निघालेले एक विमान तब्बल 35 वर्षांनंतर अचानक ब्राझीलमध्ये उतरले, अशी एक धक्कादायक कथा अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर आणि विविध संकेतस्थळांवर फिरत आहे. या कथेनुसार विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी मृतावस्थेत सांगाड्यांच्या रूपात आपल्या जागेवर बसलेले होते. एवढेच नाही तर विमानाचा कॅप्टनही कॉकपिटमध्ये कंट्रोल्स पकडून बसलेला असल्याचा दावा करण्यात आला. या रहस्यमय कथेमुळे जगभरात खळबळ उडाली होती. काहींनी याला भुताटकी घटना म्हटले तर काहींनी टाइम ट्रॅव्हलचे उदाहरण असल्याचा दावा केला. मात्र, या संपूर्ण कथेमागचे सत्य वेगळेच आहे.
या कथेनुसार, सेंटियागो एअरलाइन्सची फ्लाइट 513 हे 4 सप्टेंबर 1954 रोजी जर्मनीहून ब्राझीलकडे निघाले होते. विमानात 88 प्रवासी आणि 4 क्रू सदस्य असे एकूण 92 जण होते. उड्डाणानंतर काही वेळातच अटलांटिक महासागरावरून जात असताना विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला आणि त्यानंतर विमानाचा कोणताही तपास लागला नाही. अनेक दिवस शोधमोहीम राबवूनही विमान सापडले नाही. त्यामुळे सर्व प्रवासी आणि कर्मचारी मृत झाल्याचे गृहीत धरण्यात आले.
35 वर्षांनी अचानक विमान उतरल्याचा दावा
यानंतर कथेनुसार, 14 नोव्हेंबर 1989 रोजी ब्राझीलमधील एका विमानतळावर कोणतीही पूर्वसूचना किंवा परवानगी न घेता एक अज्ञात विमान उतरले. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या रडारवर विमान दिसताच सुरक्षायंत्रणा सतर्क झाली. विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरले पण त्यातून कोणीही बाहेर आले नाही.
सुरक्षा पथकाने विमानात प्रवेश केला असता त्यांना धक्काच बसला. विमानातील सर्व 92 जण सांगाड्यांच्या अवस्थेत आपल्या-आपल्या सीटवर बसलेले होते. या विचित्र घटनेमुळे सुरक्षा कर्मचारी घाबरून बाहेर आले आणि तातडीने ब्राझील सरकारला माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पण सत्य काय?
प्रत्यक्षात ही संपूर्ण कथा खोटी आहे. अशा प्रकारचे कोणतेही विमान कधीच सापडले नव्हते. या कथेला कोणताही अधिकृत पुरावा, विमान वाहतूक नोंद किंवा सरकारी दस्तऐवज उपलब्ध नाही.
असे सांगितले जाते की, जर्मनीतील एका वृत्तपत्रात ही कथा प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर पडताळणी न करता अनेक माध्यमांनी ती प्रसिद्ध केली. पुढे सोशल मीडियामुळे या कथेला आणखी प्रसिद्धी मिळाली.