कोण आहेत वृंदावनचे ‘Gen Z बाबा’? १९व्या वर्षी बनले भागवत कथाकार, लूकमुळे सोशल मीडियावर व्हायरल
Gen Z Baba : सोशल मीडियावर सध्या वृंदावनमधील १९ वर्षीय शाश्वत आचार्य महाराज यांची जोरदार चर्चा सुरू आहे. खांद्यापर्यंत कुरळे केस, पांढरा कुर्ता आणि कपाळावर वैष्णव टिळा अशा त्यांच्या लूकमुळे नेटकऱ्यांनी त्यांना ‘जेन झी बाबा’ असे नाव दिले आहे. मात्र, त्यांच्या लोकप्रियतेमागे केवळ लूक नसून वयाच्या चौथ्या वर्षापासून सुरू झालेला भागवत कथा वाचनाचा प्रवासही आहे.

सोशल मीडियावर दररोज अनेक जण वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येतात. सध्या वृंदावनमधील एका तरुण महाराजांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अवघे १९ वर्षे वय असलेल्या या महाराजांना नेटकरी ‘जेन झी बाबा’ (Gen Z Baba) म्हणत आहेत. त्यांचे नाव शाश्वत आचार्य महाराज असून, त्यांच्या कुरळ्या केसांचा, साध्या राहणीमानाचा आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाचा सोशल मीडियावर दबदबा आहे. इतक्या कमी वयात ते भागवत कथाकार म्हणून ओळखले जातात. जाणून घेऊया कोण आहेत शाश्वत आचार्य महाराज आणि त्यांचा आध्यात्मिक प्रवास कसा आहे.
कोण आहेत शाश्वत आचार्य महाराज?
श्री स्वामी शाश्वत आचार्य जी महाराज यांचा जन्म ५ ऑगस्ट २००७ रोजी वृंदावन येथे झाला. त्यांचे वडील स्वामी वृंदावन आचार्य जी महाराज हे देखील संत आहेत. शाश्वत आचार्य हे वृंदावनमधील श्री धाम गोदा विहार मंदिराचे पीठाधीश्वर आहेत. त्यांचे बालपण धार्मिक वातावरणात गेले असून, लहानपणापासूनच त्यांना भजन, कीर्तन आणि धार्मिक ग्रंथांची आवड होती.
वयाच्या चौथ्या वर्षापासून भागवत कथा वाचन
शाश्वत आचार्य यांचा धार्मिक क्षेत्रातील प्रवास अगदी लहान वयातच सुरू झाला. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, इतर मुले खेळण्यांमध्ये रमलेली असताना ते वयाच्या चौथ्या वर्षी भगवद्गीतेतील श्लोक म्हणत असत. एवढेच नव्हे, तर वयाच्या चौथ्या वर्षापासूनच त्यांनी व्यासपीठावर बसून छोट्या कथा आणि प्रवचन देण्यास सुरुवात केली होती. हळूहळू त्यांच्या कथा वाचनाची शैली आणि ज्ञानामुळे श्रोत्यांची संख्या वाढत गेली.
शिक्षण आणि दीक्षेची प्रक्रिया सुरू
धार्मिक कार्यासोबतच शाश्वत आचार्य शिक्षणही घेत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, त्यांचे शिक्षण मथुरा येथील गिरिराज महाराज लॉ कॉलेजमध्ये बीए-एलएलबी अभ्यासक्रमासाठी सुरू असल्याचे सांगितले जाते. त्यांचे मामा आशुतोष शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ते शिक्षण आणि दीक्षेशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करत आहेत. ते आपल्या कुटुंबासोबत वृंदावनमध्ये राहतात.
सोशल मीडियावर ‘जेन झी बाबा’ म्हणून लोकप्रिय
शाश्वत आचार्य यांच्या सोशल मीडिया लोकप्रियतेमागे त्यांचा वेगळा लूक हेही एक कारण आहे. खांद्यापर्यंत कुरळे केस, पांढरा कुर्ता, कपाळावर वैष्णव टिळा आणि शांत स्वभाव यामुळे ते नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. सोशल मीडियावर अनेक जण त्यांना ‘Gen Z Baba’ तर काही जण ‘Facecardaeshwar Guruji’ असे म्हणत आहेत. त्यांच्या कमी वयामुळे आणि आध्यात्मिक जीवनशैलीमुळे तरुणांमध्येही त्यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.