दिवाळीत पणत्या घेताना करू नका घाई! चांगले दिवे निवडण्यासाठी लक्षात ठेवा या 5 गोष्टी
दिवाळीसाठी बाजारातून पणत्या खरेदी करताना केवळ चांगले दिसत आहेत म्हणून खरेदी करू नका. पणत्या चांगल्या दर्जाच्या आहेत की नाही, हे ओळखण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणे गरजेचे आहे.

दिवाळीच्या सणात पूजेसाठी आणि घर सजवण्यासाठी मातीच्या पणत्या खरेदी केल्या जातात. बाजारात साध्या पणत्यांपासून ते रंगीबेरंगी आणि आकर्षक डिझाइनच्या पणत्यांपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध असतात. मात्र, दिसायला सुंदर असलेली प्रत्येक पणती चांगल्या दर्जाची असेलच असे नाही. काही पणत्यांना बारीक तडे गेलेले असतात किंवा त्या व्यवस्थित भाजलेल्या नसतात. त्यामुळे त्या वापरताना तेल गळण्याची किंवा दिवा लावल्यानंतर पणती फुटण्याची शक्यता असते. अशा समस्या टाळण्यासाठी पणत्या खरेदी करताना काही गोष्टी तपासणे गरजेचे आहे.
तडे तपासा पणती खरेदी करताना सर्वप्रथम तिचा पृष्ठभाग नीट पाहा. पणतीला कुठेही बारीक तडे, तुटलेले भाग किंवा कडा खराब झालेल्या नसाव्यात. काही वेळा हे तडे सहज लक्षात येत नाहीत. अशा पणत्यांमधून तेल गळू शकते किंवा वापरताना त्या फुटू शकतात. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी प्रत्येक पणती काळजीपूर्वक तपासा.
तळ सपाट असावा
पणतीचा खालचा भाग म्हणजेच तळ सपाट आहे की नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे. सपाट तळ असलेली पणती जमिनीवर किंवा इतर पृष्ठभागावर ठेवल्यानंतर स्थिर राहते. तळ वाकडा किंवा असमान असल्यास पणती डगमगू शकते आणि सहज उलटण्याची शक्यता असते. त्यामुळे पणती खरेदी करताना तिचा तळ नक्की तपासा.
पणती व्यवस्थित भाजलेली असावी
मातीची पणती खरेदी करताना तिच्या मजबुतीकडे लक्ष द्या. व्यवस्थित भाजलेली पणती तुलनेने मजबूत असते. मात्र, कमी भाजलेली पणती ठिसूळ असू शकते आणि लवकर तुटू शकते. त्यामुळे पणतीची बनावट आणि फिनिशिंग पाहा. हाताळताना सहज मातीचा चुरा निघत असेल किंवा ती खूपच कमकुवत वाटत असेल, तर अशी पणती खरेदी करणे टाळा.
जास्त रंग आणि चमक असलेल्या पणत्या टाळा
बाजारात अनेक रंगीबेरंगी आणि चमकदार पणत्या पाहायला मिळतात. त्या दिसायला आकर्षक असल्या तरी खरेदी करताना त्यावरील रंग आणि कोटिंग तपासणे आवश्यक आहे. विशेषतः पणतीच्या आतील बाजूस रंग, ग्लिटर किंवा चमकदार थर नसावा. तेल किंवा तूप घालून दिवा लावण्यासाठी शक्यतो रंग न दिलेल्या साध्या मातीच्या पणत्यांची निवड करा.
पाणी शोषण्याची क्षमता तपासा
पणती घरी आणल्यानंतर तिचा दर्जा तपासण्यासाठी एक सोपी पद्धत वापरता येते. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात पणती साधारण अर्धा तास भिजत ठेवा. त्यानंतर ती किती पाणी शोषते, हे पाहा. पणती जास्त पाणी शोषत असल्यास ती तेल किंवा तूपही अधिक प्रमाणात शोषू शकते. त्यामुळे अशा पणत्या वापरण्यापूर्वी त्यांची गुणवत्ता तपासणे महत्त्वाचे आहे.
