
सध्या लग्नाचा सीजन सुरू आहे. येणाऱ्या काळात जिकडे तिकडे बँड वाजणार आहेत. त्यामुळे लग्नाचा कारभारही वाढणार आहे. खरेदी विक्रीमुळे बाजाराला झळाळी येणार आहे. तर घराघरांमध्ये आनंदाचं वातावरण असणार आहे. लोक लग्नात नटून थटून येतात. वरातीसमोर नाचतात. नवरदेवाची वरात येते तेव्हा लोक घोड्यासमोर कंबरेला लटके झटके देत डान्स करतात. पण लग्नातील अनेक गोष्टी लोकांना माहीत नसतात. नवरदेव ज्या घोड्यावर बसून येतो आणि लोक त्याच्यासमोर नाचतात तो मुळी घोडा नसतोच. ती घोडी असते. आणि प्रत्येक नवरदेव घोडीवर बसूनच त्याची वरात घेऊन येत असतो. नवरदेव घोडीवरच का बसतो? घोड्यावर बसून का येत नाही? असा सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे. त्याचंच उत्तर आपण जाणून घेऊया.
लग्नात नवरदेव घोडीवर बसून वरात का आणतो? यामागचं कारण आपण जाणून घेणार आहोत. ही परंपरा काय आहे? त्याने काय लाभ होतो? याचीही माहिती घेणार आहोत. काहींना या प्रश्नांची उत्तरे माहीत आहेत. काहींना चुकीची उत्तरे माहीत आहेत, तर काहींना उत्तरे माहीतच नाही. असंही असतं होय? असं म्हणणारेही काही लोक आहेत. त्यांच्याचसाठी आपण आज या प्रश्नाची उकल करणार आहोत.
जबाबदारीशी संबंध
नवरदेव जेव्हा घोडीवर चढतो तेव्हा त्याची एकप्रकारची टेस्ट होत असते. नवरदेव घोडीवर व्यवस्थित बसला तर तो सर्व जबाबदाऱ्या पार पाडू शकतो, असं सांगितलं जातं. भविष्यात आपली पत्नी आणि मुलांची चांगली काळजी घेईल. ज्या प्रकारे तो घोडीला नियंत्रित करेल, त्याच प्रकारे तो आपल्या वैवाहिक जीवनातील जबाबदाऱ्याही व्यवस्थित पार पाडेल, अशीही मान्यता आहे.
घोडी चंचल, तर घोडा…
नवरदेव नेहमी घोडीवर चढतो, घोड्यावर चढून येत नाही हे तुम्ही पाहिलं असेलच. घोडीवर चढण्यामागे एक खास कारण आहे. घोडी घोड्याच्या तुलनेत अधिक चंचल असते. त्यामुळेच तिला नियंत्रित करणं आणि तिच्यावर बसून प्रवास करणं कठिण असतं. नवरदेव घोडीवर चढतो याचा अर्थ असा होतो की नवरदेवाने आता बालिशपणा सोडला आहे. तो आता गंभीर झाला आहे. आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत आहे. वैवाहिक जीवनात येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तो तयार झाला आहे, असंही मानलं जातं.
धार्मिक कारण काय?
नवरदेवाच्या घोडीवर चढण्यामागे एक धार्मिक कारणही आहे. भगवान श्रीरामाने अश्वमेध यज्ञासाठी घोड्याचा वापर केला होता. आम्ही आव्हानं स्वीकारण्यास तयार आहोत, असा घोड्यावर बसण्याचा अर्थ होतो. रामायण आणि महाभारतात अनेक ठिकाणी त्याचे दाखले मिळतात. युद्धातील महान शुरवीर कसे घोड्याचा वापर करायचे याची माहिती मिळते. घोड्याला नियंत्रित करणं म्हणजे इंद्रियांना नियंत्रित करण्यासारखं मानलं जातं, अशी धार्मिक मान्यता आहे.