बिअर पिणाऱ्या व्यक्तींना डास जास्त का चावतात? संशोधनात कारण आले समोर
खेळायला गार्डनमध्ये गेल्यानंतर किंवा एखाद्या ढाब्यावर जेवायला गेल्या नंतर आपल्याला डास चावतात. तसेच बिअर पित असलेल्या व्यक्तीला जास्त डास चावतात. त्यामागचे कारण तरी काय? जाणून घ्या...

आपण कुठे फिरायला गेलो किंवा उघड्या जागेवर बसलो की डास प्रचंड चावतात. पण कधी कधी आपल्या लक्षात येते की आपल्या शेजारी बसलेल्या आपल्या मित्राला फार डास चावत नाहीत. पण आपल्याला चावतात. असे का होते? असा प्रश्न अनेकांना पडतो. तसेच बिअर पिणाऱ्यांना डास जास्त चावतात असे म्हटले जाते. हे खरं आहे का? चला जाणून घेऊया…
अनेकदा आपल्याला असे वाटते की डास कोणालाही चावतात, परंतु विज्ञानानुसार डास कोणाला चावायचे निवडताना खूप चोखंदळ असतात. डास कोणाकडे आकर्षित होतात हे ठरवण्यासाठी प्रामुख्याने मानवी शरीरातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साइड वापरतात. डास आपल्या सेन्सर्सच्या मदतीने ३० ते ५० फूट अंतरावरूनच या वायूचा वास घेऊ शकतात, त्यामुळे ज्या व्यक्तींचे श्वसन वेगवान असते किंवा ज्यांच्या शरीरातून जास्त कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो, त्यांच्याकडे डास अधिक वेगाने खेचले जातात.
कोणाला जास्त डास चावतात?
केवळ श्वासच नाही, तर आपल्या शरीराचा गंध आणि घाम देखील यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मानवी घामामध्ये लॅक्टिक ॲसिड, युरिक ॲसिड आणि अमोनिया यांसारखे घटक असतात. या घटकांचा वास डासांना खूप प्रिय असतो. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेवर कोट्यवधी नैसर्गिक बॅक्टेरिया असतात. ज्यांच्या त्वचेवर विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया जास्त असतात, त्यांना डास जास्त चावतात. विशेष म्हणजे, रक्तगटाचाही यात संबंध असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. ‘O’ ब्लड ग्रुप असलेल्या लोकांकडे डास, ‘A’ किंवा ‘B’ ग्रुप असलेल्या लोकांच्या तुलनेत दुप्पट जास्त आकर्षित होतात.
बिअर पिणाऱ्यांना डास जास्त चावतात?
याव्यतिरिक्त, आपण कोणत्या रंगाचे कपडे घालतो याचाही डासांच्या निवडीवर परिणाम होतो. डास प्रामुख्याने रंगांच्या सहाय्याने आपली शिकार शोधतात आणि त्यांना गडद रंग जसे की काळा, निळा आणि लाल अधिक स्पष्टपणे दिसतात. गरोदर महिलांनाही डास चावण्याचे प्रमाण अधिक असते कारण त्यांच्या शरीराचे तापमान जास्त असते आणि त्या अधिक प्रमाणात कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतात. काही अभ्यासांनुसार मद्यपान (विशेषतः बिअर) केलेल्या व्यक्तींकडेही डास लवकर आकर्षित होतात. थोडक्यात सांगायचे तर, आपल्या शरीराची उष्णता, कार्बन डायऑक्साइड आणि शरीराचा विशिष्ट गंध यांमुळे डास काही ठराविक लोकांनाच जास्त लक्ष्य करतात.