
बरेच लोक असे असतात जे गादीशिवाय झोपू शकत नाहीत, त्यामुळे दुसऱ्या बेडवर झोपू शकत नाहीत. तर काही लोक त्यांच्या गाद्यांबाबत खूप चोखंदळ असतात आणि त्यांना आरामदायी झोप देणारी गादीच खरेदी करायची असते.
साधारणपणे, एखादी गादी खरेदी करताना, त्या गादीची स्प्रिंग चांगल्या स्थितीत आहे की नाही, लेटेक्स आणि फोम खराब आहेत का वगैरे, हे लोकं काळजीपूर्वक तपासतात, कारण या सर्व गोष्टींमुळे आरामदायी झोप मिळू शकते. असो, गादी कितीही आरामदायी असो, तु्म्ही कधी 7 कोटी रुपयांची गादी खरेदी करण्याचा विचार केला आहे का ?
खरंतर, मुंबईतील एका इंटीरियर डिझायनर महिलेने इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक आलिशान गादी दाखवण्यात आली आहे, आणि त्या गादीची किंमत आहे, तब्बल 7 कोटी रुपये. ती ऐकून सगळेच अवाक् झालेत. हेस्टेन्स मुंबई हे उत्कृष्ट स्वीडिश कारागिरीसह हस्तनिर्मित बेडसाठी प्रसिद्ध आहे. 1852 मध्ये स्थापन झालेला या ब्रँडने राजकारण्यांपासून ते अनेक सेलिब्रिटींपर्यंत सर्वांसाठी बेड तयार केला आहे.
गाद्याची रोल्स रॉयस
या गादीला गाद्यांचे रोल्स रॉयस असे नाव देण्यात आलं आहे. ही गादी फक्त हाताने बनवली जात नाही तर, ती एक गादी बनवण्यासाठी अतिशय कुशल कारागिरांना 300 तासांपेक्षा अधिक कालावधी लागतो. तसेच ही गादी कापूस, लोक आणि घोड्यांचे केस याने भरलेली आहे, अशी माहिती समोर येत आहे.
गादीवर घामच येत नाही
दरम्यान इंटीरियर डिझायनरने स्पष्ट केले की, गादीतील घोड्याचे केस केवळ दाखवण्यासाठी नाहीत; ते नैसर्गिक झऱ्यांचं काम करतात, म्हणजेच त्यामुळे हवा फिरू शकते त्यामुळे गादी कधीही उष्णता अडकवत नाही. म्हणूनच या गादीवर झोपल्यावर तुम्हाला कधीच घाम येणार नाही. फोम, लेटेक्स किंवा सिंथेटिक्सपासून मुक्त असलेली ही गादी पूर्णपणे नैसर्गिक साहित्याने बनवली असून त्यामुळे अधिक योग्यपणे श्वास घेता येतो. असेही म्हटले जाते की हे गादी कालांतराने तुमच्या शरीराशी जुळवून घेते. ते मेमरी फोम नाहीये, पण ते तुमची आठवण ठेवतं. तुम्ही त्यावर जितका जास्त वेळ झोपाल तितकंच ते चांगलं वाटेल.