आधार कार्ड मोफत अपडेट करा, ‘ही’ आहे शेवटची तारीख!

आधार कार्ड मोफत अपडेटसाठी शेवटची तारीख जवळ येत आहे. ज्यांनी अद्याप अपडेट केले नाही, त्यांनी तातडीने अर्ज करावा. योग्य प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांसह आधार अपडेट कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

आधार कार्ड मोफत अपडेट करा, ‘ही’ आहे शेवटची तारीख!
aadhar card
| Edited By: | Updated on: Jun 05, 2025 | 1:49 PM

आधार कार्ड हे भारतातील प्रत्येक नागरिकासाठी अत्यावश्यक ओळखपत्र आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, बँकेत खातं उघडण्यासाठी, मुलांच्या शाळा-कॉलेज प्रवेशासाठी किंवा मोबाईल सिमसाठी आधार आवश्यक असतो. मात्र, अनेक नागरिकांच्या आधार कार्डातील माहिती अद्ययावत नसते, ज्यामुळे त्यांना शासकीय सेवांचा लाभ घेताना अडथळे येतात. हीच अडचण दूर करण्यासाठी UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुवर्णसंधी दिली आहे. मात्र, ही सुविधा 14 जून 2025 पर्यंतच मर्यादित आहे. त्यानंतर या अपडेटसाठी शुल्क आकारलं जाणार आहे.

का आवश्यक आहे आधार अपडेट?

आजही अनेक नागरिकांच्या आधारमध्ये चुकीचं नाव, जुना पत्ता, चुकीची जन्मतारीख किंवा बदललेला मोबाइल नंबर आहे. ही माहिती चुकीची असल्यास आधार पडताळणी फेल होते, आणि बँक व्यवहार, सरकारी सबसिडी, शिष्यवृत्ती, पेन्शन यासारख्या सेवांमध्ये अडथळा निर्माण होतो. यासाठी आधार वेळोवेळी अपडेट करणं गरजेचं ठरतं.

कोणती माहिती मोफत अपडेट करता येते?

UIDAI ने सांगितलं आहे की 14 जून 2025 पर्यंत नागरिकांना ऑनलाइन मोफत माहिती अपडेट करण्याची मुभा दिली आहे. यामध्ये नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख (फक्त एकदाच), आणि मोबाइल क्रमांक यांचा समावेश आहे. मात्र, बायोमेट्रिक अपडेटसाठी (बोटांचे ठसे, डोळ्यांचा स्कॅन, फोटो) आधार केंद्रावर प्रत्यक्ष जावं लागेल आणि त्यासाठी शुल्क द्यावं लागेल.

अपडेटची प्रक्रिया कशी?

1. ऑनलाइन पद्धत:

  • UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर (https://myaadhaar.uidai.gov.in/) जा.
  • “Document Update” पर्याय निवडा.
  • आधार नंबर टाका, कॅप्चा कोड भरा आणि “Send OTP” क्लिक करा.
  • ओटीपी टाकून लॉगिन करा आणि अपडेट करायची माहिती निवडा.
  • आवश्यक दस्तऐवज अपलोड करा आणि सबमिट करा.
  • अपडेटचा SRN क्रमांक मिळेल, ज्याच्या सहाय्याने स्थिती तपासता येईल.

2. ऑफलाइन पद्धत:

  • जवळच्या आधार सेवा केंद्रावर जाऊन आधार अपडेट/नोंदणी फॉर्म भरावा.
  • आवश्यक कागदपत्रांसह तो फॉर्म सादर करावा.
  • बायोमेट्रिक माहितीची गरज असल्यास ती द्यावी.
  • सुरुवातीला ही मोफत सुविधा 14 डिसेंबर 2024 पर्यंत होती, मात्र UIDAI ने ती वाढवून 14 जून 2025 केली आहे. या तारखेपर्यंत अपडेट न केल्यास ऑनलाइन अपडेटसाठी ₹25 आणि आधार केंद्रात जाऊन अपडेट केल्यास ₹50 शुल्क आकारलं जाईल.

कोणत्या कागदपत्रांची गरज लागेल?

  1. ओळखपत्राचा पुरावा (PoI): पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी.
  2. पत्त्याचा पुरावा (PoA): वीज बिल, बँक पासबुक, भाडे करार, राशन कार्ड.
  3. जन्मतारीख (DoB): जन्म प्रमाणपत्र, शाळेचं प्रमाणपत्र.

ही कागदपत्रं स्पष्ट, रंगीत आणि वैध असावीत.