
उन्हाळ्यात घरात एसी चालू असतानाही तापमान कमी होत नाही, असं अनेकदा जाणवतं का? आणि त्याहूनही मोठी समस्या म्हणजे महिन्याच्या शेवटी येणारं वाढलेलं वीज बिल! पण तुम्हाला माहिती आहे का, की घरातल्या भिंतींवर लावलेला रंगही यामागे एक मोठं कारण ठरू शकतो?
अनेकदा आपण घराची सजावट करताना रंग फक्त सौंदर्याच्या दृष्टीने निवडतो. पण काही रंग घरात उष्णता अडकवतात, तर काही रंग घर नैसर्गिकरित्या थंड ठेवू शकतात. गडद रंग जसे की निळा, काळा, हिरवा हे सूर्यप्रकाश शोषतात, ज्यामुळे भिंती गरम होतात. उलट फिकट रंग उष्णता परावर्तित करतात आणि घर थंड ठेवतात.
आज बाजारात असे काही खास प्रकारचे पेंट्स मिळतात जे ‘थंडावा’ देण्याचं काम करतात. यामध्ये Heat Reflective Paint, Cool Paints, किंवा Solar Reflective Coating यांचा समावेश होतो. हे रंग सूर्यकिरण परत फेकतात आणि भिंती किंवा छप्पर जास्त तापू देत नाहीत. याचा थेट फायदा म्हणजे घराच्या आतचं तापमान कमी राहतं.
जर तुम्हाला खास पेंट्स वापरायचं नसेल, तरी पांढरा, हलका निळा, ऑफ-व्हाईट, पिस्ता अशा रंगांचा पर्याय निवडल्यास उष्णतेपासून काही अंशी बचाव होतो. काही Insulative Paints असेही असतात जे उष्णतेचा थेट भिंतीमधून घरात प्रवेश होऊ देत नाहीत. हे पेंट्स भिंतींना एका थर्मल कवचासारखं संरक्षण देतात.
या पद्धतीमुळे घर नैसर्गिकरित्या थंड राहतं आणि त्यामुळे एसी किंवा कूलरचा वापर कमी करावा लागतो. यामुळे वीजेची बचत होते आणि घरात सतत थंडावा जाणवतो. काही वेळा ही बचत महिन्याला शेकडोंच्या घरात असू शकते.