2026 मध्ये श्रीमंत व्हायचंय? पैसे दुप्पट करण्यासाठी अशा पद्धतीने करा गुंतवणूक

२०२६ मध्ये तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी तज्ज्ञांनी सुचवलेले गुंतवणुकीचे ५ सोपे आणि फायदेशीर मार्ग जाणून घ्या. वाढत्या महागाईत बँकेपेक्षा जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' नव्या पद्धतींचा वापर करा

2026 मध्ये श्रीमंत व्हायचंय? पैसे दुप्पट करण्यासाठी अशा पद्धतीने करा गुंतवणूक
financial planning tips
| Updated on: Jan 02, 2026 | 4:20 PM

सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाची जल्लोषात सुरुवात झाली आहे. नवीन वर्षात अनेकांनी विविध संकल्प केले असतील. पण त्यासोबतच आर्थिक नियोजन करणेही गरजेचे असते. दिवसेंदिवस वाढती महागाई आणि बदलती बाजारपेठ पाहता आता फक्त बँकेत पैसे ठेवून संपत्ती वाढत नाही. जर तुम्हाला तुमचे पैसे वेगाने वाढवायचे असतील, तर जुन्या पद्धतींशिवाय काही नवीन पर्यायांचा विचार करणे गरजेचे आहे. यंदा २०२६ मध्ये तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी तज्ज्ञांनी गुंतवणुकीचे ५ सोपे आणि फायदेशीर मार्ग सुचवले आहेत. ज्याचा वापर करुन तुम्ही आर्थिक नियोजन करु शकता.

1. ‘मल्टि-ॲसेट’ फंड: जोखीम कमी, परतावा जास्त

बऱ्याचदा शेअर बाजार पडला की आपल्याला भीती वाटते. अशा वेळी मल्टि-ॲसेट फंड कामाला येतात. यात तुमचे पैसे एकाच वेळी सोने, शेअर बाजार आणि सरकारी योजनांमध्ये विभागले जातात. यामुळे एका ठिकाणचे नुकसान दुसरे क्षेत्र भरून काढते आणि तुमचे पैसे सुरक्षित राहतात.

2. डिजिटल सोने : दागिने नको, बाँड्स हवेत!

सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर आता प्रत्यक्ष दागिने विकत घेण्यापेक्षा गोल्ड ईटीएफ किंवा गोल्ड बाँड्स हा उत्तम पर्याय आहे. यात चोरीची भीती नसते आणि दागिने मोडताना कापले जाणारे मेकिंग चार्जेस देखील वाचतात. २०२६ मध्ये सोन्याचे भाव स्थिर राहण्याची शक्यता असल्याने हा एक सुरक्षित पर्याय आहे.

3. घर न घेता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक

स्वतःचे घर किंवा गाळा घेण्यासाठी लाखो-कोट्यवधी रुपये लागतात. पण आता तुम्ही फक्त काही हजार रुपयांपासून मोठ्या मॉल किंवा ऑफिस कॉम्प्लेक्सच्या मालकीमध्ये वाटा मिळवू शकता. याला REITs म्हणतात. यातून तुम्हाला घराच्या भाड्यासारखे नियमित उत्पन्न मिळत राहते.

4. ‘ग्रीन एनर्जी’मध्ये गुंतवणूक

सध्या जगभरात सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर वाढत आहे. २०२६ मध्ये अशा कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणे फायदेशीर ठरेल, ज्या पर्यावरणासाठी काम करत आहेत. या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स भविष्यात चांगली वाढ देऊ शकतात.

5. टार्गेट मॅच्युरिटी फंड

ज्यांना शेअर बाजाराची भीती वाटते, त्यांच्यासाठी हा फिक्स्ड डिपॉझिटला (FD) एक चांगला पर्याय आहे. यात तुमचे पैसे एका ठराविक कालावधीसाठी (३ वर्षे) लॉक केले जातात आणि सरकारी रोख्यांमध्ये गुंतवले जातात. एफडीपेक्षा यात थोडा जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते.

(डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती केवळ शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने आहे. शेअर बाजार किंवा कोणत्याही योजनेतील कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा नक्की करा,)