एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश
राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान आज महापालिका निवडणुकासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. उमदेवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे, ऐनवेळी काही उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे विरोधी पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. आतापर्यंत महाविकास आघाडीमधील अनेक उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे, त्याचा थेट फायदा हा महायुतीला झाला आहे. महायुतीचे अनेक उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत असून, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
नागपुरात महापालिका निवडणुकीपूर्वी घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रभाग 21 चे अधिकृत उमेदवार गौरव महाजन यांनी शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला नागपुरात मोठा धक्का बसला आहे. गौरव महाजन यांनी केवळ आपला उमेदवारी अर्जच मागे घेतला नाही तर त्यांनी थेट शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक 21 चे अधिकृत उमेदवार अजय दलाल यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे.
दरम्यान दुसरीकडे जळगावमध्ये देखील शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे, उमेदवारानं ऐनवेळी माघार घेतल्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा विजयी झाला आहे. अनेक ठिकाणी हीच परिस्थिती पहायला मिळत आहे, काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी तर काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे त्याचा थेट फायदा हा भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीला झाला आहे, अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आतापर्यंत महायुतीचे एकूण 57 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
