आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर किती वेळा बदलता येतो? नियम काय?

आधार कार्डमधील माहिती अपडेट करता येते, पण त्यावर काही मर्यादा आहेत. मोबाइल नंबर कोणतीही मर्यादा न ठेवता कितीही वेळा बदलता येतो, मात्र त्यासाठी आधार केंद्राला भेट देणं आवश्यक आहे. नावात फक्त दोन वेळा बदल करता येतो आणि यासाठी वैध दस्तऐवज आवश्यक असतात.

आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर किती वेळा बदलता येतो? नियम काय?
aadhar card
| Updated on: May 02, 2025 | 10:12 PM

भारतात आधार कार्ड हे केवळ ओळखपत्रच नाही, तर अनेक शासकीय आणि खाजगी सेवांसाठी अत्यावश्यक कागदपत्र बनले आहे. बँक खाते उघडणे, शाळा-कॉलेज प्रवेश, सरकारी योजनांचा लाभ अशा अनेक ठिकाणी आधारची गरज भासते. त्यामुळे यामधील माहिती अचूक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चुकीची माहिती असल्यास व्यवहारांमध्ये अडथळा येऊ शकतो. यासाठी UIDAI काही ठराविक अटींसह माहिती अपडेट करण्याची सुविधा देते.

मोबाइल नंबर किती वेळा बदलता येतो?

UIDAI ने मोबाइल नंबर अपडेटवर कोणतीही संख्यात्मक मर्यादा घातलेली नाही. म्हणजेच, गरज भासल्यास मोबाइल नंबर कितीही वेळा बदलता येऊ शकतो. मात्र, हा बदल ऑनलाइन करता येत नाही. यासाठी जवळच्या आधार सेवा केंद्रावर प्रत्यक्ष भेट देणं आवश्यक असतं. यावेळी ₹५० शुल्क आकारलं जातं.

नाव किती वेळा बदलता येतं?

नावात बदल करण्यास केवळ दोन वेळांपर्यंतच परवानगी आहे. स्पेलिंगमधील चूक दुरुस्त करणे, किंवा विवाहानंतर आडनावात बदल करणे यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरते. यासाठी आधार सेवा केंद्रात संबंधित दस्तऐवज — जसे की पॅन कार्ड, पासपोर्ट, लग्नाचा दाखला इत्यादी सादर करावे लागतात. दोन्ही वेळा बदल केल्यानंतरही काही गंभीर कारणासाठी नाव बदलायचं असल्यास, UIDAI च्या प्रादेशिक कार्यालयात विशेष विनंती करावी लागते.

जन्मतारीख किती वेळा अपडेट करता येते?

फक्त एकदाच जन्मतारीख अपडेट करण्याची परवानगी आहे. शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट किंवा जन्म प्रमाणपत्र यासारख्या अधिकृत कागदपत्रांच्या आधारे ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. यानंतर पुन्हा बदल करायचा असल्यास, वैध कारण आणि पुराव्यासह UIDAI कार्यालयात संपर्क साधावा लागतो.

पत्ता किती वेळा बदलता येतो?

पत्ता बदलण्यावर कोणतीही मर्यादा नाही. स्थलांतर, भाड्याचं घर बदलणं किंवा कायमचा पत्ता बदलल्यास, आवश्यक दस्तऐवजांसह पत्ता कितीही वेळा अपडेट करता येतो. ही प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून करता येते.

ऑनलाइन अपडेटसाठी myAadhaar पोर्टलचा वापर करावा लागतो. पत्त्याचा पुरावा अपलोड करावा लागतो आणि OTP द्वारे पडताळणी केली जाते.

ऑफलाइन पद्धतीने, आधार सेवा केंद्रात जाऊन संबंधित कागदपत्रांसह फॉर्म भरून बदल करता येतो.

अपडेट प्रक्रिया आणि शुल्क

डेमोग्राफिक अपडेट (नाव, पत्ता, मोबाइल नंबर) – ₹५०

बायोमेट्रिक अपडेट (बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन) – ₹१००

ऑनलाइन अपडेट केल्यास SRN (Service Request Number) च्या मदतीने स्थिती तपासता येते.

मर्यादा ओलांडल्यास काय करावं?

जर नाव किंवा जन्मतारीख बदलण्याची UIDAI ने ठरवलेली मर्यादा पार केली असेल, तर प्रादेशिक कार्यालयात URN (Update Request Number) आणि वैध पुराव्यांसह विनंती करावी लागते. तक्रार किंवा विनंती UIDAI च्या help@uidai.gov.in या ईमेलवर पाठवता येते, किंवा थेट १९४७ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येतो.