MSSC : मोदी सरकार करणार महिलांचा सन्मान! महिलांसाठी खास योजना, असे मिळेल आर्थिक बळ

| Updated on: Apr 01, 2023 | 6:09 PM

MSSC : मोदी सरकारच्या या योजनेत महिलांचा सन्मान होणार आहे. त्यांना या योजनेत बचतीवर मोठा फायदा होईल. त्यांना आर्थिक बळ मिळेल.

MSSC : मोदी सरकार करणार महिलांचा सन्मान! महिलांसाठी खास योजना, असे मिळेल आर्थिक बळ
Follow us on

नवी दिल्ली : महिलांसाठी केंद्र सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. त्या योजना लोकप्रिय आहेत. यामध्ये काही गुंतवणूक योजना आहेत. आता त्यात आणखी एका योजनेची भर पडली आहे. महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजना (MSSC) 1 एप्रिल 2023 रोजीपासून सुरु होत आहे. या योजनेत महिला आता त्यांच्याकडील रक्कम गुंतवणूक करु शकता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात या योजनेची घोषणा केली होती. आता या योजनेसाठी अर्थ खात्याने अधिसूचना काढली आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना महिला वा लहान मुलीच्या नावे 31 मार्च 2023 पासून दोन वर्षांसाठी खाते उघडता येईल.

खाते कुठे उघडाल

महिला सम्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना कोणतीही महिला अथवा लहान मुलीच्या नावे पालकांना सुरु करता येईल. योजनेतंर्गत 31 मार्च 2023 पासून दोन वर्षांसाठी खाते उघडता येईल. या योजनेत गुंतवणूकदारांना एकल प्रकारचे खाते उघडता येईल. खाते पोस्ट ऑफिस अथवा बँकेत उघडता येईल.

हे सुद्धा वाचा

दोन लाख करा जमा

या योजनेवर गुंतवणूकदारांना 7.5 टक्के निश्चित व्याज मिळेल. दोन वर्षांच्या कार्यकाळात, महिला अथवा लहान मुलींच्या नावे दोन लाख रुपयांपर्यंत ठेव ठेवता येईल. या योजनेत कमीत कमी 1,000 रुपये तर जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करता येतील. वार्षिक 7.5 टक्के व्याज तिमाहीत जमा करता येईल.

इतकी काढता येईल रक्कम

या योजनेत गुंतवणूकदारांना दोन वर्षांपर्यंत रक्कम ठेवता येईल. गरजेच्यावेळी रक्कम काढता येईल. खाते उघडल्यानंतर त्यांना एक वर्षानंतर खात्यातील रक्कम काढता येईल. एकावेळी खातेदार 40 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकेल. लेखा कार्यालयात त्यासाठी फॉर्म क्रमांक 3 जमा करावा लागेल. त्यानंतर रक्कम प्राप्त होईल.

करा खाते बंद

  1. खातेदाराचा मृत्यू झाल्यास तेव्हा खाते बंद करता येईल
  2. खातेदार गंभीर आजारी असेल, त्याला असाध्य रोग असल्यास
  3. लहान मुलीचा मृत्यू झाल्यास, त्याचा नावाचे खाते बंद करता येईल
  4. आर्थिक विवंचना असेल, त्यासंबंधीची अडचण पटवून दिल्यास खाते बंद होईल
  5. इतर काही कारण असेल तर व्याजदराच्या अटींची पुर्तता करुन खाते बंद होईल

 

या गोष्टी ठेवा लक्षात

  1. ही एकप्रकारची एकवेळची बचत योजना आहे.
  2. या योजनेत गुंतवणूकदार एका वेळी दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकतो.
  3. या योजनेत गुंतवणूकदार दोन वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येईल.
  4. केंद्र सरकारने घोषीत केलेला व्याजदर वार्षिक 7.5 टक्के आहे.
  5. देशात ही योजना महिलांसह मुलींना आत्मनिर्भर करु शकते.