शासकीय विश्रामगृहात मोठं घबाड… विधिमंडळातील अंदाज समितीच्या आमदारांसाठी 1 कोटींहून अधिकची रोकड? प्रकरण नेमकं काय?
महाराष्ट्र विधान मंडळाच्या अंदाज समितीचा तीन दिवसीय दौरा धुळ्यात सुरू झाला. या दौऱ्यात ११ आमदार आले आहे. या समितीत आलेल्या आमदारांना देण्यासाठी पाच कोटी रुपये शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊसच्या दोन नंबरच्या खोलीत ठेवण्यात आले आहेत, असा आरोप गोटे यांनी केला होता.
धुळ्यात एक मोठी बातमी समोर आली आहे. धुळ्यात शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलं आहे. गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये एक कोटी 84 लाख रुपयांची रोकड आढळल्याची माहिती मिळतेय. दरम्यान पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेली कारवाई पहाटे चार वाजता संपली आहे. पोलिसांनी या रोकडची मोजणी गुरुवारी पहाटे चार वाजता केल्यानंतर पोलिसांनी ती खोली सील केली. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. दरम्यान, विधिमंडळातील अंदाज समितीमधील आमदारांना देण्यासाठी रक्कम जमा करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडून करण्यात आला आहे. धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये सापडलेल्या रक्कमेची चौकशी करण्याची मागणी आमदार अनिल गोटे यांनी केली होती. यानंतर पोलिसांनी ही रोकड मोजली आणि चौकशी सुरू केली आहे.