पश्चिम महाराष्ट्र तुपाशी अन्… दादा आता तुम्हीच…; अजित पवारांच्या बॅनरची चर्चा
जळगावच्या आकाशवाणी चौकात लावलेल्या एका बॅनरने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाजवळ लावलेल्या या बॅनरवर खानदेशातील उपेक्षेचा आरोप करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या या बॅनरमुळे खानदेशासाठी मंत्रिपदाची मागणी जोर धरत आहे. बॅनरवर अनिल पाटील यांना मंत्रिपद मिळावे, अशी अप्रत्यक्ष मागणी असल्याचे बोलले जात आहे.
जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यालयाजवळ लावलेल्या एका अनोख्या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे. बॅनरवर लिहिलेला मजकूर असा आहे: “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फक्त पश्चिम महाराष्ट्र तुपाशी, विदर्भ आणि खानदेश नेहमी उपाशी! मग आम्ही का यावं तुमच्यापाशी? अजित दादा, खानदेशवासीयांच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार?”
हा बॅनर कोणी लावला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु त्यावर “खानदेशातील एक खरा सामाजिक कार्यकर्ता” असा उल्लेख आहे. या बॅनरद्वारे खानदेशातील राजकीय नेतृत्वाला मंत्रिपद मिळावे, अशी अप्रत्यक्ष मागणी व्यक्त केली जात असल्याची चर्चा आहे. विशेषतः, खानदेशातील एकमेव आमदार अनिल पाटील यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी हा बॅनर लावण्यात आल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

