Kerala Story Row : जितेंद्र आव्हाड यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…
VIDEO | 'केरला स्टोरी'वरील केलेलं 'ते' विधान जितेंद्र आव्हाड यांना भोवणार? देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं भाष्य
मुंबई : राज्यासह देशभरात ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये चित्रपटावर बंदी आणली आहे तर मध्यप्रदेशनंतर आता उत्तरप्रदेशमध्येही टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा चित्रपट उत्तरप्रदेशमध्ये टॅक्स फ्री करणार असल्याचे ट्विट केले तर महाराष्ट्रातही हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा यासाठी भाजप नेत्यांकडून मागणी केली जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे आणि ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, खोटारडे पणाला देखील हद्द असते. एका राज्याला आणि एका धर्माला बदनाम केले जात आहे. या चित्रपटाचा निर्मात कोण आहे, त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे. चित्रपटाच्या माध्यमातून महिलांना देखील बदनाम केले जात आहे. ऑफिशियल आकडा तीन असताना बत्तीस हजार कुठून आला, असा प्रश्न त्यांनी विचारला. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य चुकीचं आणि बेकायदेशीर आहे. एखाद्या विशिष्ट समाजाचं लांगुल चालन कऱण्याकरता त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांचं वक्तव्य तपासून पाहिलं जाईल आणि यामध्ये काही बेकायदेशीर आढळल्यास कारवाई केली जाईल’, असेही ते म्हणाले.