‘भाजपात गेलो होतो, पण…’; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची काँग्रेसमध्ये घरवापसी
गोंदिया जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे गोंदिया विधानसभेत काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल विरुद्ध भाजपचे विनोद अग्रवाल अशी लढत होण्याची शक्यता आहे.
माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांची काँग्रेसमध्ये घरवापसी होणार असल्याने प्रफुल्ल पटेल यांच्या गडात आज काँग्रेसचं मोठं शक्तीप्रदर्शन पाहायला मिळालं. “पाच वर्षाआधी मी विकासाची हमी घेऊन भाजपमध्ये गेलो होतो, पण भाजप कार्यकर्त्यानी मला पराभूत केलं”, असं माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी म्हटलं. ‘मी गेली पाच वर्षे इमाने इतबारे भाजपचे पक्षाचे काम केले, न भूतो न भविशात असं काम मी स्थानिक स्वराज्य संस्थेत काम केलं. गेल्या निवडणूकीत माझ्या विरोधात जे उमेदवार होते त्यांना भाजपने पूर्ण साथ दिली. गोंदिया जिल्ह्याचा हवा तसा विकास झाला नाही, सिंचन प्रकल्प पूर्ण झाले नाही, असेही गोपालदास अग्रवाल यांनी सांगत नाराजी व्यक्त केली. ‘काँग्रेसने गोंदियामध्ये लढावं हा माझा हट्ट आहे, मी निवडणूक लढण्यासाठी तिकीट मागणार आहे. मी जेव्हा काँग्रेस सोडली तेव्हा काँग्रेसला धक्का बसला होता. मी नाना पटोले ते खर्गे यांच्याकडून गोंदियामध्ये काँग्रेसने लढावे असे आश्वासन घेतलं आहे.’, असे गोपालदास अग्रवाल यांनी म्हटले.