Devendra Fadnavis Swearing-in : आतापासून महाराष्ट्रात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
राजभवनावर महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. स्वत: एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याची विनंती करत, शिवसेनेकडून पाठिंब्याचं पत्रही दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
मुंबईत आझाद मैदानावर अतिशय भव्यदिव्य स्वरुपात महायुती सरकारचा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा कार्यक्रम आज पार पडला. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. भाजपने 132 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री बनेल हे जवळपास निश्चित होतं. मात्र आज 13 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतली आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 21 वे मुख्यमंत्री बनले आहेत. या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्याला तब्बल 22 राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बॉलिवूड कलाकारांसह संत-महंतांनी देखील उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा ‘देवेंद्र’पर्वाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांची काल नेतेपदी निवड म्हणजे, अधिकृतपणे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा. विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये फडणवीसांची निवड झाली आणि थोड्याचवेळात राजभवनावर महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. स्वत: एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याची विनंती करत, शिवसेनेकडून पाठिंब्याचं पत्रही दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.