AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाकिस्तानी चित्रपटाच्या प्रदर्शनावरून थेट इशारा

‘तर महागात पडेल हे विसरू नका’, राज ठाकरेंचा पाकिस्तानी चित्रपटाच्या प्रदर्शनावरून थेट इशारा

| Updated on: Sep 22, 2024 | 5:40 PM
Share

पाकिस्तानी कलाकार फवाद खानच्या चित्रपटाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विरोध दर्शविण्यात येतोय. ‘लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून घेण्यात आली आहे. यासंदर्भातील एक ट्वीट राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं असून त्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे.

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान यांचा बहुचर्चित पाकिस्तानी चित्रपट ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट येत्या 2 ऑक्टोबर रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादात सापडलाय. याप्रकरणी राज ठाकरे यांनी ट्विट केले आहे.
‘फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, ‘लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात? आणि कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे, पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही. हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरु आहे? महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे,’ असं राज ठाकरे यानी म्हटले आहे.

‘त्यामुळे वेळीच पाऊलं उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पहावं. मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या, तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये. कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे,’ असेही त्यांनी म्हटले आहे. तर ‘हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरु होणार आहे. अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार आणि उगाच संघर्ष आम्हाला पण नको आहे,’ अशा थेट इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

Published on: Sep 22, 2024 02:15 PM