Mumbai Children Hostage : मुंबई हादरली… पवईत डांबून ठेवलेल्या 20 मुलांची आरोपीच्या तावडीतून सुटका, नेमकं घडलं काय?
मुंबईच्या पवई येथील रा स्टुडिओमध्ये एका व्यक्तीने ऑडिशनसाठी आलेल्या १५ ते २० मुलांना ओलीस ठेवले होते. मानसिक अस्वस्थता असलेल्या या व्यक्तीने स्वतःच्या काही मागण्या पूर्ण करण्यासाठी हा थरार घडवला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत सर्व मुलांना सुरक्षित बाहेर काढले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
मुंबईतील पवई येथे एका व्यक्तीने रा स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी जमलेल्या सुमारे १५ ते २० मुलांना ओलीस ठेवल्याने खळबळ उडाली होती. ही घटना पवईतील एल अँड टी गेट क्रमांक पाचसमोरील रा स्टुडिओमध्ये घडली. संबंधित व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या व्यक्तीने मुलांच्या पालकांना स्टुडिओबाहेर थांबवून मुलांना आतमध्ये बंदिस्त केले होते.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या व्यक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मुलांनी स्टुडिओच्या काचेवर हात आपटून बाहेर येण्याची विनंती केल्याचे दृश्यांमध्ये दिसत होते, ज्यामुळे पालक भयभीत झाले होते. मुंबई पोलिसांनी त्वरित कारवाई करत सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले.

