AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : E20 Petrol : E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने खळबळ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

Rahul Gandhi : E20 Petrol : E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने खळबळ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

| Updated on: Nov 07, 2026 | 1:25 PM
Share

राहुल गांधींनी E20 पेट्रोलमधील इथेनॉलच्या प्रमाणावर केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. कर्नाटक सरकारने केलेल्या चौकशीत पेट्रोलमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक इथेनॉल (20 टक्क्यांपेक्षा जास्त) आढळले आहे. या अहवालानंतर कर्नाटक सरकारने तेल कंपन्यांवर कठोर कारवाई आणि वाहन मालकांना भरपाई देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

राहुल गांधींनी E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या प्रमाणावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. E20 पेट्रोलच्या नावाखाली नागरिकांच्या वाहनांशी खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. पेट्रोलमध्ये मिसळण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या प्रमाणाबद्दल कर्नाटक सरकारने केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

केंद्राने E20 पेट्रोलमध्ये केवळ 20 टक्के इथेनॉल मिसळण्यास मंजुरी दिली असतानाही, पेट्रोलमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक इथेनॉल आढळल्याचे या चौकशीतून स्पष्ट झाले आहे. कर्नाटक सरकारने बंगळुरू, कोलार, चिक्कबल्लापूर, बंगळुरू ग्रामीण, रामनगर, मंगळूरू आणि तुमकरमधून 7 जिल्ह्यांतील पेट्रोलचे 14 नमुने गोळा केले होते. बंगळुरू येथील मान्यताप्राप्त श्रीराम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. अहवालानुसार, 14 पैकी 11 नमुन्यांमध्ये इथेनॉलचे प्रमाण 20 टक्क्यांपेक्षा अधिक आढळले. इंडियन ऑईलच्या पेट्रोलच्या एका नमुन्यात 31.2 टक्के, तर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या एका नमुन्यात 30.5 टक्के इथेनॉल आढळल्याचे अहवालात म्हटले आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी कर्नाटक सरकारचे हे आरोप फेटाळले आहेत. मात्र, या अहवालानंतर कर्नाटक सरकारने तेल कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची आणि वाहन मालकांना भरपाई देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. राहुल गांधींनी यावरून पंतप्रधान मोदींना सवाल केला आहे, “तुम्ही पैसे मोजून महागडे पेट्रोल खरेदी करत आहात, मात्र तुमच्या गाडीच्या टाकीत पेट्रोलपेक्षा जास्त प्रमाणात इथेनॉल मिसळले जात आहे. मोदीजी, वाहनधारकांच्या टाकीत नेमके काय भरले जात आहे, सांगणार का? तुमच्या धोरणांचा प्रत्यक्ष फायदा नेमका कुणाला होतोय? 20 टक्क्यांची मर्यादा ओलांडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई कधी होणार?”

Published on: Nov 07, 2026 01:25 PM

Follow Us