AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi | विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला थेट संदेश, म्हणाले...

Rahul Gandhi | विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला थेट संदेश, म्हणाले…

| Updated on: Aug 12, 2026 | 1:32 PM
Share

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे. जंतरमंतरवरील तरुणांच्या आंदोलनादरम्यान पॅलेट गनने गोळीबार करण्याचे आदेश कुणी दिले आणि लाठीचार्जचे आदेश कुणाचे होते, याचे उत्तर अमित शाह यांनी आधी द्यावे, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले. संसद परिसरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे. जंतरमंतरवरील तरुणांच्या आंदोलनादरम्यान पॅलेट गनने गोळीबार करण्याचे आदेश कुणी दिले आणि लाठीचार्जचे आदेश कुणाचे होते, याचे उत्तर अमित शाह यांनी आधी द्यावे, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले. संसद परिसरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली.

“आम्हाला अमित शाह यांचं लेक्चर ऐकायचं नाही. ते फक्त लेक्चर देतात. जंतरमंतरवर पॅलेट गनने गोळ्या झाडण्याचे आदेश कुणी दिले, हे त्यांनी आधी सांगावं. लाठीचार्जचे आदेश कुणाचे होते, हेही स्पष्ट करावं,” असे राहुल गांधी म्हणाले. या कारवाईचे आदेश अमित शाह यांनी दिले असतील, तर ते दोषी आहेत आणि त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

याचवेळी अमित शाह यांनी असे आदेश दिले नसतील, तरीही या संपूर्ण परिस्थितीची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा, असा दावा राहुल गांधी यांनी केला. “जर त्यांनी आदेश दिले असतील तर ते दोषी आहेत. त्यांनी तसे केले नसेल तरी ते अकार्यक्षम आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा,” अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली.

राहुल गांधी माध्यमांशी संवाद साधत असताना काही पत्रकारांनी मध्येच प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. यावर राहुल गांधी यांनी माध्यमांवरही नाराजी व्यक्त केली. “मी बोलत असताना तुम्ही मध्येच प्रश्न विचारता. ते बोलतात तेव्हा तुम्ही मध्येच का बोलत नाही? आम्हालाच का असं करता?” असा सवाल त्यांनी केला.

यावेळी राहुल गांधी यांनी माध्यमांच्या भूमिकेवरही जोरदार टीका केली. “आम्ही बोलत असताना 24 तास हस्तक्षेप करता. मग त्यांच्यात असं काय आहे की संपूर्ण मीडिया त्यांच्यासमोर उंदरासारखा उभा राहतो?” असा सवाल त्यांनी केला. आंदोलन करणारे विद्यार्थी अमित शाह यांना घाबरत नाहीत, त्यामुळे माध्यमांनीही घाबरू नये, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.

अमित शाह यांच्या संभाव्य वक्तव्याबाबत बोलताना राहुल गांधी यांनी त्यांच्यावर आणखी एकदा निशाणा साधला. “अमित शाह येऊन काय बोलणार, हा प्रश्न नाही. त्याची आम्हाला पर्वा नाही,” असे ते म्हणाले. गेल्या 20 दिवसांपासून अमित शाह सार्वजनिकपणे फारसे बोलत नव्हते, असा दावा करत राहुल गांधी यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

“ते संसदेत येत होते आणि जात होते. त्यांचा ताफा असायचा, पण ते बोलत नव्हते. फुग्यातून हवा निघून गेली आहे. शेवटच्या क्षणी ते गॅस भरण्याचा प्रयत्न करत आहेत,” अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी केली. अमित शाह यांच्यात धाडस नसल्याचाही आरोप त्यांनी केला.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे जंतरमंतरवरील आंदोलन, कथित गोळीबार आणि लाठीचार्जच्या आदेशांवरून केंद्र सरकारविरोधातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. त्यांच्या आरोपांवर अमित शाह किंवा केंद्र सरकारकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 12, 2026 01:32 PM

Follow Us