AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईची प्रगती मराठी माणसाच्या थडग्यावर...; राज ठाकरेंचा खरमरीत टोला

मुंबईची प्रगती मराठी माणसाच्या थडग्यावर…; राज ठाकरेंचा खरमरीत टोला

| Updated on: Oct 19, 2025 | 1:28 PM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्रस्तावित अदानी प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. जंगलतोड आणि आदिवासींच्या विस्थापनावर त्यांनी चिंता व्यक्त केली. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्राची प्रगती मराठी माणसाच्या हक्कांवर गदा आणून होत असेल, तर ती खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मोठमोठे रस्ते उद्योगपतींच्या फायद्यासाठी बनवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रातील विकासाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये प्रस्तावित अदानी पॉवर प्रकल्पावरून त्यांनी सरकारला आणि उद्योगपतींना इशारा दिला आहे.

राज ठाकरे यांनी सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या काही भागात जंगलतोड करून अदानी समूह एक पॉवर प्रकल्प उभारणार आहे. यामुळे स्थानिक आदिवासी समुदायाला विस्थापित केले जाईल. यावर त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. “मी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही,” असे स्पष्ट करत ते म्हणाले, “पण मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये होणारी प्रगती ही जर मराठी माणसाच्या थडग्यावरती होणार असेल, तर मी ती खपवून घेणार नाही.”

सध्या सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सी-लिंक आणि अटल सेतूसारखे रस्ते सामान्य लोकांसाठी नसून, जमिनी बळकावणाऱ्या उद्योगपतींच्या सोयीसाठी बनवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. उद्योगपतींना नजर पडेल ते पाहिजे अशी भूक लागली असून, ही स्थिती सहन केली जाणार नाही, असा दम राज ठाकरे यांनी दिला. मराठी माणसाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.

Published on: Oct 19, 2025 01:28 PM