Shakti Cyclone Warning : राज्यावर पुन्हा नवं सकंट, मुंबई-कोकणात ‘या’ दिवशी शक्ती चक्रीवादळ घोंगावणार, IMD चा इशारा
शक्ती चक्रीवादळामुळे मुंबई आणि कोकण किनारपट्टीला 6 व 7 ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाला सज्ज राहण्याचे निर्देश दिले असून, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे.
शक्ती चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकणात 6 आणि 7 ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अरबी समुद्रात घोंघावत असलेले ‘शक्ती’ नावाचे हे चक्रीवादळ सध्या पश्चिमेच्या दिशेने सरकत आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली असून, प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
विशेषतः मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना खबरदारीचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. सध्या तरी या वादळाचा थेट परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवत नसला तरी, पुढील दोन दिवस समुद्रात वादळसदृश परिस्थिती कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या वादळाचा परिणाम खोल समुद्रात मोठ्या प्रमाणावर जाणवेल अशी शक्यता आहे.

