Satyacha Morcha : मनसे, मविआच्या सत्याचा मोर्चाला सुरूवात
मुंबईत महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीने सत्याचा मोर्चा काढण्यात आला आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक प्रमुख नेते यात सहभागी झाले आहेत. बोगस मतदारांची नावे वगळणे, ईव्हीएम गैरव्यवहाराचा तपास आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी या मोर्चातून करण्यात आली. पोलिसांनी परवानगी नाकारूनही हा मोर्चा काढण्यात आला.
मुंबईत आज महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात आला. मतदार यादीतील बोगस नावे वगळणे, दुबार नावे हटवणे, ईव्हीएम गैरव्यवहाराचा तपास करणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील यांसारखे महत्त्वाचे नेतेही सहभागी झाले होते.
ठाकरे बंधूंनी यानिमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत राजकीय शक्तीचे प्रदर्शन केले. यापूर्वी निवडणूक आयोगाला भेटताना किंवा विविध सभांमध्ये ते एकत्र दिसले होते आणि आता या मोर्चाच्या निमित्ताने त्यांनी एकत्र नेतृत्व केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.

