‘अर्धवट माहिती असणाऱ्यांना उत्तर देणं…’, राज ठाकरे यांना दिलेल्या ‘त्या’ अव्हानावर मनसे नेत्याचं प्रत्युत्तर
VIDEO | मराठी भाषा आणि मराठी भाषेवरील प्रेमासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलेल्या आव्हानावर मनसे नेत्याचं भाष्य, बघा काय दिलं प्रत्युत्तर
ठाणे : केरला स्टोरी (The Kerala Story ) चित्रपटामुळे धार्मिक ध्रुवीकरण होत असून तरीही काही नेते हा चित्रपट मोफत दाखवत आहेत. आता शाहीर साबळे चित्रपट रिलीज झाला आहे। शाहीर साबळे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनासाठी लढाई दिली, मात्र त्यांचा चित्रपट कोणीही मोफत दाखवताना दिसत नाही. राज ठाकरे मराठीचं सतत प्रेम दाखवत असतात, आता ते गप्प का? असा सवाल आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी केला होता. तसंच खरंच राज ठाकरेंना मराठीचं प्रेम असेल, तर त्यांनी केरला स्टोरीच्या पार्श्वभूमीवर शाहीर साबळे हा चित्रपट महाराष्ट्रातल्या जनतेला मोफत दाखवावा, असंही खरात म्हणाले होते. याबाबत मनसे नेते अविनाश जाधव यांना विचारलं असता, सचिन खरात यांचं नाव मी पहिल्यांदा ऐकलंय, यापूर्वी मी नावही ऐकलेलं नाही. पण त्यांनी जर पूर्ण माहिती घेतली असती, तर शाहीर साबळे चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेत लाँच झाला. या चित्रपटाचं म्युझिक लॉन्च राज साहेबांच्या हातून झालं. या चित्रपटासाठी राज ठाकरेंनी सगळी मदत केली. टॉकीज मिळत नव्हते त्यासाठीही राज ठाकरे यांनी अनेकांना फोन केले, हे जर तुम्ही या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांना विचारलं, तर ते नीट सांगतील, असं अविनाश जाधव म्हणाले. परंतु ज्याला अर्धवट माहिती आहे किंवा फक्त एखादी भूमिका मांडायची म्हणून मांडत असेल, तर अशांना उत्तर देणं मी गरजेचं समजत नाही, असं म्हणत त्यांनी अधिक बोलणं टाळलं.

