25 वर्षांपासून राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे भाजपच्या वाटेवर

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरी जाऊन राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदेंनी मंत्री राम शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे बबनरावांचा भाजप प्रवेेश निश्चित मानला जात आहे

  • रवी लव्हेकर, टीव्ही 9 मराठी, पंढरपूर
  • Published On - 11:37 AM, 31 Aug 2019
25 वर्षांपासून राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे भाजपच्या वाटेवर

पंढरपूर : राष्ट्रवादीला बसणारे धक्के थांबण्याची आणि पडलेलं खिंडार बुजण्याची चिन्हं काही केल्या दिसत नाहीत. माढा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरी जाऊन बबनराव शिंदेंनी मंत्री राम शिंदे यांची भेट घेतली. राम शिंदे भाजपच्या मुलाखतीसाठी आले असल्याने बबनरावांचा भाजपप्रवेश निश्चित मानला जात आहे.

नुकत्याच झालेल्या शिवस्वराज्य यात्रेतही बबनराव शिंदेंनी सहभाग नोंदवला नव्हता, तेव्हाच ते राष्ट्रवादी सोडणार असल्याचं निश्चित मानलं जात होतं. गेल्या पंचवीस वर्षांपासून आमदार असलेले बबनराव शिंदे हे त्यांचे सुपुत्र, झेडपी सदस्य रणजीत सिंह शिंदे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. यासाठीच ते पक्षांतर करणार असल्याचं बोललं जातं.

गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत झेडपी सदस्य रणजीत सिंह शिंदे यांचं पोस्टर कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलं होतं. त्यावेळी पक्षप्रवेशासंदर्भात वृत्त मात्र त्यांनी फेटाळलं होतं.

माढ्यात झालेल्या महायुतीच्या महामेळाव्यात शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजीराव सावंत यांनी आमदार बबनराव शिंदे हे आज शिवसेनेच्या दारात, तर उद्या भाजपच्या दारात असल्याची टीका केली होती. शिवसेनाच माढ्यातून जागा लढवणार असून कोणत्याही परिस्थितीत माढ्यातून शिवसेनेच्या उमेदवारासाठी आग्रही असल्याची भूमिका जाहीर केली होती.

भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांनी शिंदेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास विरोध करणार असल्याची भूमिका जाहीर केली होती. मुलाखतीला न आलेल्या उमेदवारांना उमेदवारी न देण्याचे संकेत मंत्री राम शिंदे यांनी दिले होते.

बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल आणि करमाळ्याच्या आमदार रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश करत राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. तर आमदार शिंदे हेदेखील भाजपच्या वाटेवर असल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अभेद्य गडाला धक्का बसणार आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात वर्चस्व असलेल्या शिंदे यांच्या भाजप प्रवेशाने भाजपची ताकद नक्की वाढणार आहे.

शिंदे बंधूंच्या भाजप प्रवेशाला विरोध नसल्याचं खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी सांगितलं आहे. एक सप्टेंबरला आमदार शिंदे यांचा वाढदिवस असून ते या मुहूर्तावरच भाजपमध्ये प्रवेश करणार की पाच तारखेच्या मेगाभरती प्रवेश करणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.